१५ तज्ज्ञांकडून होणार कोरोना सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:57 PM2020-05-18T12:57:59+5:302020-05-18T12:58:12+5:30
२१ रोजी पाहणी : ठिकठिकाणी होणार ४००जणांची तपासणी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत ‘नॅशनल सेरो सर्व्हे’ केला जाणार असून यासाठी १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक २० रोजी जिल्ह्यात दाखल होणार असून २१ मे रोजी जिल्ह्यातील दहा गावांमध्ये प्रत्येकी ४० अशा ४०० जणांची तपासणी करणार आहे़
राज्यात १८ ते २२ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये हे सर्व्हेक्षण केले जाणार आहेत़ यासाठी विविध पथक तयार करण्यात आल्या असून या पथकातील प्रमुखांना सहकार्य म्हणून जिल्हा रुग्णालय व स्थानिक आरोग्य यंत्रेणेतील ज्यांना रक्ताचे नमुने घेता येतात असे तंत्रज्ञ घेतले जाणार आहे़ यात १० वैद्यकीय अधिकारी व १० तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याचे आदेश रविवारी संध्याकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिले. हे पथक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनंचा आढावाही घेणार आहे़ आयसीएमरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश असणार आहे़
या पथकांना वाहने, पीपीई किट, मास्क आदी बाबी उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठविण्यात आले आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़
दरम्यान, गावांची निवड ही शासनाकडूनच झालेली असून दहा टीम दहा गावांमधूनच नमुने घेऊन जाणार आहेत, अशी माहिती डॉ़ चव्हाण यांनी दिली़
या ठिकाणी तपासणी
यावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या रँडमली दहा घरंची निवड करून प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी केली जाणार आहे़
कोरोनाचा आढावा
कोणाला कोरोना होऊन गेला आहे का? त्यांच्यात प्रतिकार शक्ती किती, विकसित झाली, या बाबी या तपासणीतून समोर येणार आहे़ या तपासणीचे अहवाल काही वेळाने होणार प्राप्त होतील, जिल्ह्यात चारशे जणांची अशी तपासणी होणार आहे़ पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी घेण्यात येणार आह़े त्यानंतर महिन्याच्या अंतराने ही तपासणी होणार असल्याची माहिती आहे़