आता दिवसा फिरणाऱ्यांचीही रस्त्यावरच कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:16 AM2021-04-17T04:16:04+5:302021-04-17T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या रात्री विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. जर गरज भासली तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या रात्री विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. जर गरज भासली तर दिवसादेखील विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रात्री विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात काही जण पॉझिटिव्ह असल्याचे देखील आढळून आले. त्यांची रवानगी तेथूनच थेट कोविड सेंटरला करण्यात आली. त्यावर बोलताना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, रात्री रस्त्यांवर केलेल्या चाचण्यांमधून काही जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जर यापुढे गरज भासली तर दिवसा देखील रस्त्यांवर थांबवून कोरोना चाचणी केली जाईल. जळगाव शहरातच नाही, तर तालुक्याच्या ठिकाणी देखील असे रुग्ण आढळून आले आहेत.’
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
त्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. त्यासोबतच सर्व प्रांताधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कडक निर्बंध पाळण्यासंदर्भात काही शंका आणि संभ्रम होते, जिल्हाधिकारी यांनी ते दूर केले.