जिल्ह्यात कोरोना साठ हजाराच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:51+5:302021-02-25T04:19:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. शहरात दिवसभरात १६४ नवे रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. शहरात दिवसभरात १६४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हाभरात ३६३ नवे रुग्ण आहेत. जिल्ह्यात गुरूवारी चाचण्या देखील वाढवल्या आहेत. दिवसभरात तब्बल २७४६ चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी अद्याप १७६६ अहवाल प्रलंबित आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी २७४६ चाचण्या करण्यात आल्या. तर यापैकी आलेल्या अहवालांमधून ३६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरात सर्वाधिक १६४ रुग्ण आहेत.तर त्याखालोखाल चाळीसगावमध्ये ५३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांपैकी १९० रुग्ण हे आरटीपीसीआर तपासणीतून तर १७३ रुग्ण हे अँटीजेन चाचणीतून समोर आले आहेत.
तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही १७९० आहे.
न्यायालयातही संसर्ग वाढला
शहरात १६४ रुग्ण आहेत. त्यात आता न्यायालयीन कामकाजाशी संबंधित असणाऱ्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. न्यायालयातील दोघांना आणि न्यायाधीश कॉलनीत राहणाऱ्या एकाला बाधा झाली आहे. तर इतर भागात शिवाजी नगर, ब्रुक बॉण्ड कॉलनी, बिबा नगर, मोहाडी रोड, रिंग रोड, मुक्ताईनगर, द्रौपदी नगर, मेहरुण, धांडेनगर, गुरुदत्त नगर, गणपती नगर, आदर्श नगर, पोस्टल कॉलनी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर सिव्हील कोर्ट, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, राधाकृष्ण नगर, वाघ नगर, महाबळ कॉलनी, साई नगर, शिवाजी नगर, यशवंत नगर, भिकमचंद जैन नगर येथे प्रत्येकी दोन तर औद्योगिक वसाहतीत तीन रुग्ण आढळून आले आहेत.
दोघांचा मृत्यू
बुधवारी भुसावळ तालुक्यातील ६४ आणि ७४ वर्षांच्या पुरुषांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जीएमसीतील दोन कोरोना वॉर्ड फुल्ल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन कोरोना वॉर्ड पुर्ण भरले आहेत. त्यातील सी वन मध्ये २० रुग्ण तर सी टी मध्ये ६० रुग्ण आहे. आता रुग्णालयातच आणखी वॉर्ड सुरू करण्यासाठी पर्यायी जागांचा विचार केला जात आहे. सध्या सी ३ या वॉर्डमध्ये आठ रुग्ण आहेत. तेथे आणखी काही रुग्णांना प्रवेश दिला जाऊ शकतो. तर नेत्र रोग विभाग रिकामे करून तेथे कोरोनाच्या रुग्णांची सोय केली जाऊ शकते.