कोरोना लसीकरण व मद्यपानाचा संबध नाही पण ते टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:25+5:302021-04-05T04:14:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना लसीकरणासाठी काही प्रमाणात असलेल्या अनास्थेसाठी मद्यपान व खानपान याबाबत नागरिकांमध्ये शंका आहेत. लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसीकरणासाठी काही प्रमाणात असलेल्या अनास्थेसाठी मद्यपान व खानपान याबाबत नागरिकांमध्ये शंका आहेत. लसीकरण व मद्यपान याबाबत वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास नसला तरी मद्यपानामुळे प्रतिकार क्षमता कमी होत असल्याने शक्यतोवर मद्यपान टाळावे असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.
जिल्ह्यात ४५ वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे काही सामान्य प्रश्न अनेकांच्या मनात गोंधळ घालत आहे. याबाबत थेट विचारणाही होत आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसानंतर मद्यपान करावे?, आहारात काय घ्यावे व काय घेऊ नये?, लसीकरणानंतर रक्तदान किती दिवसात करावे? यासारखे प्रश्न थेट विचारले जात आहे.
रशियात लसीकरणानंतर मद्यपानाला निर्बंध
डॉ.भाऊराव नाखले यांनी सांगितले की, रशियात लोकांना लस घेतल्यानंतर ४५ दिवस मद्यपान करू नये, असा सल्ला देण्यात आला होता. कारण यामुळे ॲंटीबॉडी तयार होण्यास अडचण निर्माण होते. मात्र, भारतात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. या लस घेतल्यानंतर साधारणत: तीन आठवड्यामध्ये ॲटीबॉडी तयार होतात. मद्यपान व लसीकरणाचा प्रभाव कमी होण्याबाबत कुठेही ठोस निष्कर्ष नाहीत. मात्र, अतिमद्यप्राशन केल्याने प्रतिकार क्षमता कमी होते.
कोट
लस घेतल्यानंतर मद्यपान करावे किंवा करू नये असा कुठेच अभ्यास नाही, किंवा तसा काही संबधही नाही. मात्र, मद्यपान टाळावे यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते. मांसाहाराच्या बाबतीतही तसा अभ्यास नाही. मात्र, लसीकरण केल्यानंतर मांसाहार करू नये हा गैरसमज आहे.
- डॉ. किशोर इंगोले, विभाग प्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग
लसीकरणानंतर सुरूवातीचे तीन दिवस मद्य टाळावे, कारण परिणाम लसीचा आहे की, मद्याचा यात गैरसमज होऊ शकतो. अतिमद्यप्राशन घातक असून यामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.
- डॉ. भाऊराव नाखले, विभाग प्रमुख, औषध वैद्यक शास्त्र विभाग.