जिल्ह्यातील १३ रुग्णालयात होणार कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:59+5:302021-01-13T04:37:59+5:30
जळगाव : येत्या १६ जानेवारीला कोरोनाची लस येणार असल्याने तयार राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या असून त्या दृष्टीने ...
जळगाव : येत्या १६ जानेवारीला कोरोनाची लस येणार असल्याने तयार राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या असून त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचे नियोजन पूर्ण केले आहे. यात जिल्ह्यात १३ शासकीय रुग्णालयांमध्ये ही लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे. मनुष्यबळ, प्रशिक्षण, ट्रायल या बाबी झाल्या असून यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली.
या ठिकाणी होणार लसीकरण
जिल्हा सामान्य रुग्णालय, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगरचे उपजिल्हा रुग्णालय, अमळनेर, चाळीसगाव, रावेर, पिंपळगाव हरेश्वर, न्हावी, पारोळा रुग्णालय, भुसावळ नगरपालिका रुग्णालय यासह जळगाव शहरातील नानीबाई रुग्णालय आणि डी. बी. जैन रुग्णालय या ठिकाणी हे लसीकरणाचे केंद्र राहणार आहे.
शंभर कर्मचारी एका केंद्रावर
एका केंद्रावर शंभर लाभार्थींना एका दिवसात लस देण्याचे आरोग्य यंत्रणेचे नियोजन आहे. यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात १०० कर्मचाऱ्यांचा डेमोही घेण्यात आला होता. दरम्यान, कोविन ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पाच कर्मचारी आणि त्यांच्यावर एक सुपवायझर डॉक्टर अशी यंत्रणा प्रत्येक केंद्रावर राहणार आहे.
येत्या दोन दिवसात होणार चित्र स्पष्ट
१२ किंवा १३ जानेवारी रोजी कोणती लस, जिल्ह्यात किती प्रमाणात आणि कशी येणार याबाबच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. १६ जानेवारीला शुभारंभ असल्याने त्या दृष्टीने सर्व उपाययोजना झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली. चित्र स्पष्ट झाल्यानंतर सर्व नियोजन सुरळीत होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. एका व्यक्तीला लस दिल्यानंतर साधारण महिनाभराच्या अंतराने दुसरा डोस द्यावा लागणार आहे. असे प्राथमिक नियोजन आहे.
आरोग्य सहसंचालकांनी घेतला आढावा
आरोग्य सहसंचालक डॉ. सचिन देसाई यांनी कोरोना लसीकरणासह सर्व लसीकरणाचा जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, एडीएचओ डॉ. पांढरे, माता व बालसंगोपन अधिकारी समाधान वाघ यांच्यासह सर्व तालुका आरोग्य व वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोना लसीकरणाचे नेमके नियोजन कसे याबाबत डॉ. देसाई आणि एमएनई अधिकारी डॉ. मंगेश गिरगावकर यांनी माहिती घेतली.