रावेर तालुक्यातील कोरोना बाधितांचे झाले द्विशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 06:50 PM2020-06-24T18:50:48+5:302020-06-24T18:53:12+5:30
रावेर : तालुक्यातील १८ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या २०४ वर पोहोचली असून, कोरोना ...
रावेर : तालुक्यातील १८ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या २०४ वर पोहोचली असून, कोरोना बाधितांनी द्विशतक पार केले आहे. दरम्यान, सावदा व रावेर शहरातील दोन कोरोना बाधीत रुग्णांचा बुधवारी जळगाव येथे मृत्यू झाला असून, आजपर्यंत १२६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तालुक्यातील सावदा शहरातील एकाच परिवारातील १३ वर्षे, २१ वर्षे, ५० वर्षे, ६१ वर्षे, ७५ वर्षे वयाच्या महिला व ४० वर्षे वयाचा पुरूष असे सहा जण, विवरे बुद्रूक येथील ३७ व ३९ वर्षीय पुरूष, ७५ वर्षीय महिला व आणखी दोन महिला असे पाच जण, चिनावल येथील चार जण तर रावेर शहरातील श्री स्वामी समर्थनगर, कोचूर, रसलपूर व बक्षीपूर येथील प्रत्येकी एकेक जण असे १९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २०४ वर पोहोचली असून, कोरोना बाधितांनी आता द्विशतक पार केले आहे, अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली
दरम्यान, बुधवारी सावदा शहरातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू जळगावी कोरोना रुग्णालयात झाल्याने त्यांचे अंत्यसंस्कार जळगाव येथेच करण्यात आले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात औषधोपचार घेत असलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महिलेचा मृत्यू झाला. या कोरोना बाधित मृत महिलेवर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत चार जणांनी पीपीई किट परिधान करून अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, रावेर न.पा.कडून चार पीपीई किटचा संच पुरवण्याखेरीज कोरोना बाधीत मयतावरील अंत्यसंस्कारप्रसंगी न.पा. व पोलीस विभागाकडून कोणीही जबाबदारी प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात न.पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, तालुक्यातील आजपर्यंत १२६ कोरोना बाधीत रुग्णांंची कोरोना मुक्त झाल्याने सुटका करण्यात आली आहे.