केवळ ३० मिनिटात होणार अमळनेर येथेच कोरोनाचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:53 AM2020-07-14T00:53:15+5:302020-07-14T00:53:56+5:30
संजय पाटील अमळनेर, जि.जळगाव : केंद्र सरकारने व राज्य सरकारने अमळनेर कोविड सेंटरला कोविड अँटीजन सेंटर म्हणून मान्यता दिली ...
संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : केंद्र सरकारने व राज्य सरकारने अमळनेर कोविड सेंटरला कोविड अँटीजन सेंटर म्हणून मान्यता दिली असून अवघ्या ३० मिनिटात अमळनेर येथेच रुग्णाचा कोरोनाचा अहवाल मिळणार असल्याने येथील अहवाल आता बाहेर प्रयोगशाळेत पाठवण्याची आवश्यकता नसून जिल्ह्यातील हे असे पहिलेच केंद्र आहे, असे सांगण्यात आले.
अमळनेर तालुक्यात सातत्याने रुग्ण वाढत असल्याने आणि अहवाल दोन दोन दिवसांनी येत असल्याने स्वॅब तपासण्याची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे , डॉ.संदीप जोशी व डॉ. आशिष पाटील यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कोविड अँटीजन सेंटर म्हणून रजिस्टर नोंदणी केली. त्याला राज्य शासनाने देखील मान्यता दिली असून ग्रामीण रुग्णालयाला तातडीने २०० रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे किट उपलब्ध करून दिले आहेत.
आधीच्या टेस्ट दरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यांची देखभाल आदीसाठी वेळ आणि पैसा लागत होता. आता लागलीच अहवाल मिळणार असल्याने निगेटिव्ह रुग्ण तात्काळ घरी जाणार असल्याने कोविड सेंटरला होणारी आता गर्दी टळणार आहे.
पहिल्याच दिवशी रॅपिड अँटीजन टेस्टने सहा जणांची चाचणी करण्यात आली. त्यात जानवे आणि ढेकू रोड येथील रुग्ण पॉझिटिव्ह तर चार निगेटिव्ह आले आहेत.
काय आहे रॅपिड अँटीजन टेस्ट
नेहमीप्रमाणे रुग्णांचे स्वॅब आर. सी. पी. सी. आर. टेस्ट करून घेतले जात होते. त्याचे अहवाल जळगाव किंवा धुळे प्रयोग शाळेत पाठवावे लागत होते व अहवाल मिळण्यास दोन दिवस लागत होते. मात्र रॅपिड अँटीजन टेस्ट किट मुळे अवघ्या ३० मिनिटात स्वॅबचा अहवाल प्राप्त होणार असून केव्हाही स्वॅबचा अहवाल लगेच मिळवता येणार आहे. आधीच्या आर. सी. पी. सी. आर. टेस्ट मध्ये १० च्या पटीत स्वॅब घ्यावे लागत होते
सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने सखोल अभ्यास करून रजिस्टर नोंदणी केल्याने जिल्ह्यातील एकमेव रॅपिड अँटीजन सेंटर ला मान्यता मिळाली आहे. यामुळे कोरोना तपासणीला गती मिळणार आहे. - डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर