कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:39+5:302021-05-15T04:15:39+5:30
- डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ...
- डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील, हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, सध्याची स्थिती पाहता कोरोना लसीकरणानंतरच शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागून आहे.
मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. काही दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग भरले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्या शाळा पुन्हा बंद झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणावरच भर दिला. मात्र, काही दिवसांपूर्वी आरटीई अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ मे ते १३ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर झाली आहे. त्यामुळे १४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाला आळा बसेल, असा विश्वास शासनाला आहे. विद्यार्थ्यांचेही लसीकरण झाल्यास शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, त्या वेळची कोरोना संसर्ग व लसीकरणाची स्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मत काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
-----------------------------------------
ऑनलाईन आणि ऑफलाईनही....
शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांचा उपयोग केला जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शाळांना पुढील सूचना केल्या जाणार आहेत.
-----------------------------------------
७६ हजार विद्यार्थी थेट दुसरीत
- कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच आरटीई अंतर्गत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- जिल्ह्यातील ७६ हजार ५१४ विद्यार्थी पहिलीत शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी आता थेट दुसरीत गेले आहेत.
- शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला आखावे लागणार आहे.
- हे विद्यार्थी थेट दुसरीत गेले असले तरी एकही दिवस शाळेत गेले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी दुसरीत गेले तरी शाळेत पहिल्यांदाच जाणार आहेत.
-------------------------------------------------
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यास घेतला गेला. पण, वर्गात शिक्षकांनी शिकविलेले जास्त लक्षात राहते. त्यामुळे शाळा लवकर सुरू कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजनासुद्धा शाळांमध्ये करण्यात याव्यात.
- श्लोक पाटील, विद्यार्थी
------------------------------------------------
वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यामुळे ती कंटाळली आहेत. ऑनलाईन शिक्षण मिळते, पण प्रत्यक्ष अध्यापनात व ऑनलाईन शिक्षणात फरक असतोच. त्यामुळे यावर्षी शाळा सुरू झाल्यास पाल्याला शाळेत नक्कीच पाठविणार आहे.
- आशिष दुसाने, पालक
-------------------------------------------
शाळा सुरू व्हायलाच हव्यात. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यावर सर्व अवलंबून आहे. सध्यातरी जुनी पुस्तके परत घेणे, निकाल आदी कामे सुरू आहेत.
- नीलेश पाटील, शिक्षक
--------------------------------
काय म्हणतात शिक्षणाधिकारी...
शाळांच्या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय असणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष शाळा उघडणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना केल्या जातील.
-बी. एस. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी