कोरोनाने यंदा प्राणी गणनेचा मुहूर्त हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:19 AM2021-05-25T04:19:23+5:302021-05-25T04:19:23+5:30
वाघाचेही वास्तव्य लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : सातमाळा डोंगररांगांची अभेद्य तटबंदी, विपुल वृक्षराजी, प्राण्यांसाठी पाणी आणि अन्नसाखळी यामुळे ...
वाघाचेही वास्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सातमाळा डोंगररांगांची अभेद्य तटबंदी, विपुल वृक्षराजी, प्राण्यांसाठी पाणी आणि अन्नसाखळी यामुळे पाटणादेवीसह गौताळा अभयारण्यात दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास आहे. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणी गणना केली जाते. या वर्षी मात्र कोरोनामुळे या प्राणी गणनेला ब्रेक लागला आहे.
गेल्या अनेक वर्षांत कोरोनामुळे पहिल्यांदाच खंड पडणार आहे. यामुळे बुधवारी २६ रोजी पौर्णिमेला कोरोनामुळे प्राणी गणना होणार नाही.
चाळीसगाव शहरापासून नैऋत्येला अवघ्या १८ किमी अंतरावर पाटणादेवीचा हिरवा बहर असणारा परिसर आहे. जंगल परिसरात दुर्मीळ झाडांचा समावेश आहे.
साडेसहा हजार हेक्टर परिसरात हे जंगल व्यापले आहे. अवतीभोवती सातमाळा डोंगररांगांची तटबंदी आहे. जंगल परिसरात अनेकविध प्राण्यांचा अधिवास असून यात बिबट्यांचाही समावेश आहे. याबरोबरच नीलगाय, रानगवे, रानडुकरे, माकड, मोर आदी प्राणी येथे आहेत. त्यांची संख्याही मोठी आहे. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला या प्राण्यांची गणना करण्यात येते.
............
चौकट
पौर्णिमेच्या चांदण प्रकाशात प्राणी गणना
पाटणादेवी जंगल परिसरात दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात वनविभागातर्फे प्राणी गणना केली जाते. यासाठी जंगल परिसरात २२ ठिकाणी मचाण बांधून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह वन्यजीवप्रेमी प्राणी गणनेत सहभागी होतात. या वर्षी कोरोना असल्याने बुधवारी २६ रोजी पौर्णिमेला गणना होणार नाही. वनविभागाने तसे जाहीर केले असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र राजेश ठोंबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
...........
चौकट
गौताळा अभयारण्यात प्राणी गणना नाही
पाटणादेवी जंगल परिसरालगतच गौताळा अभयारण्य परिसरातही दुर्मीळ प्राण्यांचे वास्तव्य असून दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणी गणना केली जाते. या वर्षी कोरोनामुळे येथेही प्राणी गणना होणार नाही, असे वनविभागाने कळविले आहे.
........
चौकट
गौताळात वाघाचे वास्तव्य
गौताळा अभयारण्यात फेब्रुवारीमध्ये नवा पाहुणा म्हणजेच वाघाचे आगमन झाले आहे. अगोदरच्या प्राण्यांमध्ये वाघही दाखल झाला असून फेब्रुवारीत पहिल्यांदा तो वनविभागाला आढळून आला. यानंतरही तो सातत्याने गौताळा जंगल परिसरात आढळून आला आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी व्ही.एन. सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.