कोरोना.. कोरोना करत सरले वर्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:18+5:302021-01-02T04:13:18+5:30
कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल ...
कोरोना म्हटले तरी धस्स व्हावे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली होती. चीनमधील हा विषाणू भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि जळगावातही येईल, अशी कल्पनाही जानेवारीपर्यंत कोणाला नव्हती. मात्र, मार्चमध्ये या कोरोनाने तर थेट जळगावातच धडक दिली होती आणि अतिशय भयानक आणि दहशतीत पुढील काही महिने गेले. मे महिन्यात जिल्ह्याचा मृत्युदर थेट १२ टक्क्यांवर पोहोचला होता. मध्यंतरी बाधितांचे प्रमाण ३४ टक्क्यांवर गेले होते. अनेक तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र, कोरोना आटोक्यात आला. मात्र, संपला नाही. त्यामुळे कोरोना कोरोना करत हे वर्ष संपले... एका नव्या विषाणूने मात्र आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. अनेक स्वच्छतेच्या सवयी लावून दिल्या, अनेक मोठे बदल घडविले. कोरोनाने जिल्ह्यातील १३००वर नागरिक हिरावले.. तर ५५ हजारांपेक्षा अधिक लोकांना त्याची लागण झाली. मध्यंतरी प्रशासनाचे नियोजन, नागरिकांची भीती, वैद्यकीय सेवेचा सुधारलेला दर्जा आणि एकंदरीतच कोरोनाचा कमी झालेला संसर्ग यामुळे वर्षाचा शेवट मात्र दिलासादायक राहिला. मात्र, त्यातच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रूपाचे भूत पुन्हा समोर आले आणि वर्षभरात आपण जो कोरोना अनुभव होतो, त्यापेक्षा हा वेगळा कोरोना एण्ट्री करेल का या भीतीने पुन्हा वातावरण भीतिमय झाले. त्यावर संशोधन, उपाययोजना सुरू असून, नवीन वर्षात लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वर्ष सरत असताना वर्षाच्या शेवटी शेवटी जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त सुविधा सुरळीत झाल्या, ही एक महत्त्वाची व गरीब, गरजू रुग्णांसाठी दिलासादायक बाब राहिली. जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ असे काही ठिकाणी हे कोरोनचे हॉटस्पॉट राहिले. या तीन भागांमध्येच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. जळगावपासून सुरुवात आणि अमळनेरपासून उद्रेक असा या कोरोनाने हळूहळू सर्व जिल्हा व्यापला होता... आता मात्र, रुग्ण कमी आणि भीतीही कमी असे चित्र आहे.