सुरक्षित मुक्ताईनगरवर पुन्हा 'कोरोना'चे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:35 PM2020-05-18T12:35:43+5:302020-05-18T15:03:22+5:30
सुरक्षित 'मुक्ताईनगर'वर पुन्हा 'कोरोना'चे सावट पसरले आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ येथून मुक्ताईनगर येथे आलेला रुग्ण जळगाव येथे हलविला असता त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या मृत्यू पश्चात घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. परिणामी सुरक्षित 'मुक्ताईनगर'वर पुन्हा 'कोरोना'चे सावट पसरले आहे.
तब्बल दोन महिन्यापासून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक जीवापाड प्रयत्न करीत कोरोनापासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करीत तालुका कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांना आज खीळ बसली आहे.
भुसावळ येथील डी.एल.हायस्कूल फालकनगर परिसरात वास्तव्यस असलेला ५३ वर्षीय इसम तब्बेत अस्वस्थ वाटत असल्याने व भुसावळ येथील दवाखाने बंद असल्याने तपासणीसाठी १४ रोजी मुक्ताईनगर येथील सिड फार्म पॅरिसरात नातेवाईकाकडे आलेला होता. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी त्याची शहरातील दोन खासगी डॉक्टरांकडे तपासणी झाली. रुग्णाला त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच त्या डॉक्टरांनी त्याला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथून त्या इसमास जळगावी हलविण्यात आले. १५ मे रोजी रात्री तो मयत झाला. सदर रुग्णाचा कोविड तपासणी अहवाल १८ रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दोघा डॉक्टरांसोबतच चौघे नातेवाईक क्वारांटाईन
दरम्यान, या प्रकरणात खबरदारी म्हणून १६ रोजी मुक्ताईनगर शहरातील ते दोघे खाजगी डॉक्टरांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तो ज्या ठिकाणी मुक्कामी होता त्या ठिकाणच्या चौघा नातेवाईकांनादेखील मुक्ताईनगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कोविड सेंटरमधील चौघांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
चौघांच्या अहवालाची प्रतीक्षा
दरम्यान, कोरोनामुळे दगावलेला रुग्ण भुसावळ येथील असल्याने तूर्त दिलासा आहे. मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांचे अहवाल येईपर्यंत तरी शहरावर कोरोनाचे सावट कायम आहे.
मयताचा मुलगा डॉक्टर
मयत रुग्णाचा मुलगा डॉक्टर असून, पुणे येथील प्रसिद्ध रुग्णालयात सेवा बजावत आहे.