कोरोनाचा मार...त्यात शिक्षण विभागावर प्रभारी पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:17+5:302021-04-04T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वर्षानुवर्ष अनेक पद रिक्त राहत असल्यामुळे सध्या जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागांमधील महत्त्वाच्या पदांवर प्रभारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्षानुवर्ष अनेक पद रिक्त राहत असल्यामुळे सध्या जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागांमधील महत्त्वाच्या पदांवर प्रभारी राज सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रभारीच शिक्षणाचा गाडा हाकताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या प्रभारींवर त्या पदासोबत इतर पदांची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिणामी, सद्य:स्थितीला शिक्षण विभागाची घडी विस्कटलेली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक उपक्रम, योजनांच्या प्रभावी अमंलबजावणी तसेच प्रशासकीय कामकाजासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी परिपूर्ण अस्थापना आवश्यक असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाच्या असलेल्या शिक्षण विभागाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची अनास्था राहिली. बी. जे. पाटील यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर बदली झाल्यानंतर बी. एस. अकलाडे यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला. परंतु, सध्या त्यांच्याकडे एरंडोल गटविकास अधिकारी पदाचाही पदभार आहे. दुसरीकडे निरंतर शिक्षणाधिकारी के. ए. पाटील हे सुद्धा लवकरच सेवानिवृत्त होतील. त्यामुळे ही जागा रिक्त होऊन प्रभारी पदभार दिले जाईल.
विस्तार अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक असे एकूण पाच उपशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील प्रत्येकी दोन व निरंतर उपशिक्षणाधिकारी एक अशांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे ही पदे रिक्तच राहत असल्यामुळे याठिकाणी प्रभारी राज सुरू आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
१२ गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीला ३९ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. २५ पदे अजूनही रिक्त आहे. दुसरीकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांची १५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तीन गटशिक्षणाधिकारी कार्यरत असून, उर्वरित १२ जागा रिक्त आहेत. शालेय पोषण आहार अधीक्षकच्या १३ पदे मंजूर असून, दोनच पद भरले गेलेले आहे. उर्वरित ११ जागा अजूनही रिक्त आहेत. या रिक्त पदांच्या कामाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी सांभाळत आहेत.
विद्यापीठात प्रमुख पदांवरचे प्रभारी राज
प्रा. पी. पी. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर कुलगुरू पदासह प्र-कुलगुरू व कुलसचिव पद सुद्धा संपुष्टात आले. नुकतेच प्रभारी कुलगुरू म्हणून ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा. बी. व्ही. पवार व प्रभारी कुलसचिवपदावर प्रा. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. ए. बी. चौधरी यांच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे पुन्हा प्रभारी कुलसचिवपदी श्यामकांत भादलीकर यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद येथील सतीष देशपांडे यांच्याकडे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सहसंचालक पदाचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
रिक्त असलेली प्रमुख पदे
शिक्षणाधिकारी - ०२
उपशिक्षणाधिकारी - ०५
शालेय पोषण आहार अधीक्षक-११
शिक्षण विस्तार अधिकारी-२५
कुलगुरू - ०१
प्र-कुलगुरू-०१
कुलसचिव-०१
शिक्षण सहसंचालक-०१
वित्त व लेखा अधिकारी-०१
संचालक विद्यार्थी विकास-०१
संचालक आजीवन अध्ययन-०१
अधिष्ठाता (विज्ञान व तंत्रज्ञान)-०१