कोरोना बाधिताचा मृतदेह पडून, कसे झाले अंत्यसंस्कार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:52 PM2020-07-13T12:52:53+5:302020-07-13T12:54:41+5:30
जळगाव : एका ४५ वर्षीय बाधिताचा मृतदेह उचलण्यास कोविड रुग्णालयात कोणीच तयार नव्हते. शेवटी बाहेर बसलेल्या तरुणांना एक हजार ...
जळगाव : एका ४५ वर्षीय बाधिताचा मृतदेह उचलण्यास कोविड रुग्णालयात कोणीच तयार नव्हते. शेवटी बाहेर बसलेल्या तरुणांना एक हजार रुपये देऊन हा मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी घडला.
जळगावच्या कोविड रुग्णालयात बाधितांच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे प्रकार या आधीही समोर आले आहेत. या मृतदेहांना हात लावायला किंवा उचलायला कुणी तयार होत नव्हते? त्यामुळे सुरूवातीच्या काळात हे मृतदेह बराच वेळ रुग्णालयात पडून राहत होते़ एका बैठकीत ही सर्व जबाबदारी पालिकेची असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले होते़ मध्यंतरीच्या काळात नातेवाईकांकडेच मृतदेह सोपविले जात असल्याचा प्रकार घडला होता़
किनगाव ता. यावल येथील एका ४५ वर्षीय बाधित रुग्णाला आठवडाभरापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ शनिवारी या रुग्णाचा मृत्यू झाला़ दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास या रुग्णालयातील शिपाई मृतदेह उचलण्यासाठी नातेवाईकांना बोलवत होते़ मात्र, बाधितांच्या मृतदेहांमुळे प्रचंड संसर्ग वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह उचलण्यासाठी कसे बोलावले जावू शकते, असा प्रश्न सर्वांना पडला़ त्यानंतर मृतदेहाला हात लावायला कोणी तयार नसल्याने अखेर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही तरुणांना एक हजार रुपये देण्यात आले. या मुलांनी हॅन्डग्लोज घालून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकला़ यानंतर स्मशानभूमीत कर्मचारी थांबून होते़ त्यांनीच अंत्यसंस्कार केले़ यावेळीही तीन हजार रुपये द्यावे लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले़