कोरोनाचे संकट झुगारले, वस्तीत शिक्षण उजळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 09:55 PM2020-09-04T21:55:09+5:302020-09-04T21:55:15+5:30
वलठाण आश्रमशाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी : गावोगावी जाऊन वाडी-वस्तीत भरवितात शाळा
चाळीसगाव : जिथे हाता - तोंडाची गाठ पडायची भ्रांत...तिथे आॅनलाईन शिक्षण, स्मार्टफोन हे शब्दही दुर्मीळ ठरावे...असा सगळा 'नाहीचा' पाढा असतांना वलठाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विशेषत: महिला शिक्षकांनी थेट वाडी, वस्ती आणि पाड्यांची वाट तुडवत शिक्षणाचे दीवे उजळवले आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी पोहचल्याने विद्यार्थी हरखून तर पालक आनंदून गेले आहे. कोरोनाचे संकट झुगारुन देत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणाऱ्या शिक्षकांचे हे प्रयत्न आजच्या शिक्षकदिनी 'गुरुर ब्रम्हा, गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा..' याचे प्रचिती देणारेच ठरतात.
शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुले ही गावाकुसाबाहेरील वाडी - वस्तीवरुन दाखल होतात. त्यांची वस्ती डोंगर - दरीत असल्याने 'शिक्षणाचे स्मार्ट पर्याय' अजूनही त्यांच्यापासून कोसो दूर आहे. कोरोनाकाळात शाळांच्या घंटाही शांत आहे. यावर आॅनलाईनची मात्रा देण्याचा पर्याय मध्यंतरी शासनाने ठेवलाही. मात्र वाडी - वस्तीत सुविधांचा ठणठणाट आहे. शहरात त्याला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात यात अनेक अडचणी असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. वाडी - वस्ती आणि आदिवासी पाड्यांवर राहणाºया विद्यार्थ्यांची स्थिती तर याहून मागास म्हणता येईल. त्यांच्याकडे साधे फोनही नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन, इंटरनेट हे पर्याय येथे कुचकामी ठरतात. यावर वलठाणच्या आश्रमशाळेतील शिक्षकांनी 'कोरोना'चे भय टाळत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. गेले ४५ दिवस त्यांचा हा प्रयोग विनाखंड पावसातही सुरुच आहे.
यावल आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत जाण्याची प्रेरणा दिली. याला सकारात्मक साद देत मुख्याध्यापक विशाल राठोड यांच्यासह महिला शिक्षक अलका सरदार, सी.एस.भामरे, एम.आर. पाटील, पी.आर. महाजन, आर.एन. पाते, आणि पुरुष शिक्षक सु.वा. देसले, ए.एस. गोसावी यांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी वाडी - वस्ती, पाडे पिंजून काढले आहे.चाळीसगाव तालुक्यातील हातगाव, अंधारी, रांजणगाव, बोढरे, जावळे, मजरे, मुंदखेडे, हिंगोणे, शिवापूर, वलठाण, पिंपरखेड आदि गावातील भील्ल वस्ती - वाडी आणि पाड्यांवर शाळा भरवत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखत हे शिक्षक शिक्षणाचा अध्याय मोठ्या जिद्दीने गिरवत आहे.