सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे सावट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:56+5:302021-02-25T04:19:56+5:30
निवडणुका पुन्हा ढकलल्या जाऊ शकतात पुढे : आधीच वर्षभराची दिली होती मुदतवाढ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भावामुळे ...
निवडणुका पुन्हा ढकलल्या जाऊ शकतात पुढे : आधीच वर्षभराची दिली होती मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका अद्यापही होऊ
शकल्या नाहीत. जानेवारीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या होत्या. या निवडणुका
झाल्यानंतर शासनाने कोविडमुळे थांबलेल्या सर्व मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास हिरवी झेंडी दाखविली आहेत.
यासाठी प्रशासनाकडून प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने
पुन्हा सहकारी संस्थाच्या निवडणुकांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १११८ सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. यामध्ये जिल्हा बँक, ग.स. सोसायटी, बाजार समित्या, जिल्हा दूध संघ, मविप्र या
मोठ्या संस्थाचाही सहभाग आहे. जानेवारीनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर सहकार व पणन मंत्रालयाने सर्व
थांबलेल्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा सूचना दिल्या होत्या. या निवडणुकांसाठी तयारीदेखील सुरू झाली आहे. जिल्हा बँक व दूध
संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे काम देखील सुरू झाले आहे. मात्र, आठवडाभरातच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने
वाढत आहे. ही संख्या संपूर्ण राज्यभरातच वाढत आहे. यामुळे शासनाकडून पुन्हा या निवडणुकांना ब्रेक लावण्यात येण्याची शक्यता आहे.
सहा टप्प्यात घेण्यात येतील निवडणुका
सर्व निवडणुका आता मुदत संपलेल्या कार्यकाळानुसार घेण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे थांबलेल्या ८३
सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपलेल्या २०४ संस्थाच्या, तिसऱ्या टप्प्यात ३१ मार्च
२०२० रोजी मुदत संपलेल्या ६०९ संस्थाच्या, चौथ्या टप्प्यात ३० जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ८० संस्थांच्या तर पाचव्या टप्प्यात ३०
सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ९० व शेवटच्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५२ अशा एकूण १११८ सहकारी
संस्थाच्या निवडणुका या पार पडणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शासनाकडून अद्यापपर्यंत निवडणुकांबाबत
कोणताही आदेश आला नसल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरूच आहे.
कोट..
कोरोना रुग्णांची संख्या जर वाढत जात असेल तर शासनाने निवडणुकांबाबत विचार करावा, निवडणुका येत-जात राहतील. मात्र, कोरोनाचे
संकट जर पुन्हा वाढत असेल तर शासनाला हे संकट आधी थांबविणे गरजेचे आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर निवडणुकांबाबत
विचार झाला पाहिजे.
-गुलाबराव देवकर, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक
ग.स. किंवा इतर सहकारी संस्थाच्या निवडणुकांना आधीच उशीर झाला आहे. अशा परिस्थितीत आता निवडणुकांना ब्रेक लावणे चुकीचे
आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग.स. निवडणूक ही आता ईव्हीएम मशीनव्दारे घेतली पाहिजे. जेणेकरून या निवडणुकीसाठी लागणारी
कर्मचारी संख्या कमी होईल.
-उदय पाटील, गटनेते, सहकार गट, ग.स.सोसायटी