कोरोनाची ‘ग्रामीण’मधील धडक चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 03:57 PM2020-04-21T15:57:12+5:302020-04-21T15:58:15+5:30

लॉकडाऊन, जिल्हा बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीला हरताळ, गोदामे भरली असली तरी ती गरिबांच्या उपयोगी येणार काय?, स्थलांतरित मजुरांची घरवापसी सुरुच; प्रशासनापुढे आव्हान

Corona's shock in 'rural' worries | कोरोनाची ‘ग्रामीण’मधील धडक चिंताजनक

कोरोनाची ‘ग्रामीण’मधील धडक चिंताजनक

Next

मिलिंद कुलकर्णी
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्टÑ सर्वाधिक आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या पर्वात खान्देशातील नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे कोरोनापासून दूर होते. निसर्गाच्या सान्नीध्यात राहणाऱ्या आदिवासी बहुल भागात बाधा होणे अवघड आहे, असे मानले जात असताना साक्री शहरात रुग्ण आढळला. नंदुरबार शहरात तर तब्बल चार रुग्ण एकाच कुटुंबातील निष्पन्न झाले. धुळ्याच्या मध्यवर्ती भागातही बाधित रुग्ण समोर आला. मुंगसेसारख्या अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लागण झाली. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात ‘कोरोना’ने धडक दिल्याचे स्पष्ट झाले.
या रुग्णांच्या बाधेचे कारण, प्रवासाची माहिती जाणून घेतली जात आहे. त्यात मुंबईहून आलेली मंडळी तसेच उत्तर महाराष्टÑातील एकमेव हॉटस्पॉट असलेल्या मालेगावशी संपर्क ही दोन कारणे समोर येत आहेत. पहिल्या २१ दिवसात लॉकडाऊनचा प्रभावी अंमल जाणवत असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे आठवडाभरातील रुग्णांच्या संख्येवरुन लक्षात येते. जिल्हाबंदी नावाला आहे. लोक पायी, वाहनाने उघडपणे येत आहेत. रात्रीच्यावेळी लपून छपून गावांमध्ये प्रवेश होत आहेत. मानवीय दृष्टीकोन योग्य असला तरी आता या स्थितीत जिथे आहे, तिथे राहणे खूप आवश्यक आहे. दूरत्व राखता येणे हे खूप मोठे आव्हान राहणार आहे. लॉकडाऊनच्या दुसºया पर्वात काही उद्योग-व्यापाऱ्यांना सवलत दिली आहे. पहिले दोन दिवस तर गोंधळात गेले. कोणते उद्योग-व्यापार सुरु राहणार हेच मुळी संबंधित उद्योजक-व्यापाºयांना माहित नव्हते, तर जनतेला कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण शिथिलतेचा अंमल सुरु झाला की, बाजारपेठांमध्ये गर्दी होणार आहे. ती टाळावी लागेल.
प्रशासनापुढे आणखी दोन आव्हाने राहणार आहेत. पहिले आव्हान म्हणजे, शेतीमालाची बाजारपेठेत विक्री करताना शिस्तीचे कठोर पालन होणे. बाजार समित्या सुरु झाल्या आहेत, पुढे जाऊन कापूस खरेदी केंद्रे सुरु होतील. याठिकाणी व्यवस्थित नियोजन करुन मालाची खरेदी-विक्री व्हायला हवी. दुसरे आव्हान राहणार आहे, ते स्वस्त धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेचे. मे महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य मिळणार असल्याची घोषणा झाली आहे. पिवळे आणि केशरी असे दोन्ही रेशनकार्ड धारकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने वेळापत्रक आखले असले तरी गर्दी टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांना घरपोच भाजीपाला, फळे देण्याच्या नावे विक्रेत्यांच्या सुरु असलेल्या अतिरेकाला प्रतिबंध घालायला हवा. शेतकरी असल्याचे भासवून व्यापारीच मालवाहू गाड्या घेऊन कॉलनी आणि छोट्या गावांमध्ये जाऊन गर्दी गोळा करीत आहेत.हे रोखायला हवे. दुसरे पर्व कसोटी पाहत आहे, हे मात्र खरे.
जगभर हाहाकार माजविणाºया कोरोनाने अखेर खान्देशात धडक दिली. जळगावात यापूर्वीच बाधा झाली असली तरी नंदुरबार व धुळे हे आदिवासी बहुल जिल्हे संसर्गापासून दूर होते. निसर्गाशी जवळीक, जीवनशैली ही त्याची कारणे आहेत.
पण साक्री, मुंगसेसारख्या ठिकाणी
कोरोना बाधीत रुग्ण आढळतात हा चिंतेचा विषय आहे. लॉकडाऊन करुनही १० रुग्ण आढळतात याचा अर्थ आपण संकटाच्या तोंडाशी आहोत. दुसºया पर्वात परिणाम अधिक जाणवू लागले आहेत. शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असले तरी आता तरी कठोर पावले उचलली गेली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.

Web Title: Corona's shock in 'rural' worries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.