कोरोनामुळे तृतीयपंथीयांचा जगण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:14+5:302021-05-08T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात तृतीयपंथीयांची आर्थिक परिस्थिती अंत्यंत बिकट झाली आहे. जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात तृतीयपंथीयांची आर्थिक परिस्थिती अंत्यंत बिकट झाली आहे. जिल्ह्यात नोंदणी असलेले २४० तृतीयपंथीय आहेत. त्यातही गुरू परंपरेत राहणाऱ्या तृतीयपंथीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पन्न नसल्याने त्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
गेल्या मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले. आता त्याला १४ महिने उलटत आले असले तरी परिस्थिती सुरळीत झालेली नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून असलेल्या तृतीयपंथीयांच्या वाट्याला आता दुर्लक्षित जगण्यासोबतच पोट कसे भरायचे ही विवंचनादेखील समोर आली आहे. बहुतांश तृतीयपंथी हे रेल्वे, बाजार, बस या ठिकाणी भीक मागून आपले जीवन जगत असतात. मात्र गेल्या १४ महिन्यात रेल्वेदेखील बराच काळ बंद राहिल्या आहेत. आता पूर्वीसारखे रेल्वेत जाता येत नाही. तसेच बाजारदेखील या काळात काही मोजके महिनेच सुरू राहिला आहे.त्यामुळे तृतीयपंथीयांचे उत्पन्न नाही.
काहीवेळा तृतीयपंथीय वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये सहभागी होत. तेथेदेखील त्यांना पैसे मिळत असत. मात्र मागच्या वर्षभरापासून सोहळ्यांना उपस्थितीला मर्यादा आली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, सावदा, फैजपूर, पाल चोपडा येथे तृतीयपंथीय जास्त करून राहतात. तसेच जळगाव शहरातही तृतीयपंथीयांची दोन घरे आहेत.
जगायचे कसे हीच चिंता - संजना जान
गेल्या वर्षभरापासून उत्पन्नच नाही. आमच्या गुरू परंपरेत ३६ जण आहेत. त्यातील काही जण माझ्याच घरात राहतात. ज्यांची भाड्याने घेतलेली घरे आहेत त्यांच्या मालकांना आम्ही घरभाडे कमी करण्याची विनंती केली. काहींनी ती मान्यदेखील केली आहे. त्यासोबतच आम्ही अनेकांना जमेल तशी मदत करत आहोत. पण हे किती दिवस चालणार, असे संजना जान यांनी सांगितले.
जगण्याचा मोठा प्रश्न - शमिभा पाटील
वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी तृतीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनदेखील पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनच्या काळात तृतीयपंथीयांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या समुदायाच्या पोटापाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. तृतीयपंथीयांना मदत निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, रेशन पुरवठ्यासाठी त्यांना दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका मिळाव्यात. तसेच ज्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता नसेल, अशा तृतीयपंथीयाला रेशन दुकानदारास त्याचे आधारकार्ड हाच ओळख पुरावा ग्राह्य धरावा, कोविडग्रस्त तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वाॅर्ड उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागण्या शमिभा यांनी दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.