शून्य खर्चात कोरोनाला केली गावबंदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:47 PM2020-04-09T20:47:46+5:302020-04-09T20:48:24+5:30
जळोद : अभियंत्याचा जुगाड : शेती साहित्यातून आयुर्वेदिक सॅनिटायझर खोली
संजय पाटील
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथील तरुण अभियंत्याने जुगाड लावून शेतीच्या साहित्यातून आयुर्वेदीक सॅनिटायझर खोली बनवून आपले गाव सुरक्षित केले आहे.
अमळनेर तालुक्यातील जळोद येथील प्रशांत सोनवणे हा पुण्याला यांत्रिक अभियंता म्हणून काम करतो. लॉक डाऊनमुळे तो गावी आलेला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ग्रामीण भागात सुविधा नाही. शेतकऱ्यांचे सतत शेतात बाहेर जाणे येणे, माल विक्रीस तालुक्यावर जाणे येणे सुरू राहते. तसेच निष्काळजीपणा, गरिबीमुळे महागडे सॅनिटायझर वापरणे शक्य नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत गाव सुरक्षित असणे गरजेचे आहे. म्हणून या तरुणाने शक्कल लढवित हे यंत्र तयार केले.
असे केले नियोजन
शेतीचे साहित्य फवारणी पम्प, एयर ब्लोअर आदी वापरून गावाबाहेर या तरुणाने एक खोली तयार केली आहे. रासायनिक सॅनिटायझर सतत लावल्याने ने शरीराला त्रासदायक होऊ शकते म्हणून त्याने निंब, कोरफड, तेजपान, निलगिरी, भीमसेनी कापूर वापरून आयुर्वेदिक सॅनियझर तयार केले आहे. या यंत्राला वीज पुरवठा जोडण्यात आला आहे. गावाबाहेर गेलेला शेतकरी गावात परतल्यावर अथवा नवीन व्यक्ती गावात आल्यावर गावाबाहेरील प्रवेशद्वारावर खोलीजवल दोन तरुण त्यांना थांबविले जाते. १० सेकंद ती व्यक्ती स्वत:भोवती गोल फिरते त्यावेळी बटन दाबून त्याच्या अंगावर सॅनिटायझर फवारा मारला जातो. ती व्यक्ती निर्जतुक होऊनच गावात शिरते. त्यामुळे कोरोना पासून गाव सुरक्षित झाले आहे.
गावातील युवकांची मदत
प्रशांत सोनवणेला याला या उपक्रमासाठी गावातील मनोज चौधरी, सत्यपाल चौधरी, आर.एस.सोनवणे, देवराम चौधरी यांचे सहकार्य लाभले आहे. त्याच्या या शून्य खर्चाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण अथवा शहरी भागात असे सॅनिटायझर रूम बनवायचे असतील तर तो मोफत मार्गदर्शन करणार आहे.
---
कोट
निंब, कोरफड, निलगिरी, कापूर, तेजपान हे आयुर्वेदिक घटक जंतुनाशक आहेत. प्रमाणात सेवन केल्यास मानवी प्रतिकार शक्ती वाढते. मात्र त्याची फवारणी केल्यास कोरोना विषाणू जाणार नाही. त्यासाठी शासनाने ठरवलेले सॅनिटायझर योग्य आहे.- डॉ.दिलीप पोटोडे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी.