मालधक्क्यावरील एजंटचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:54 AM2020-07-04T11:54:10+5:302020-07-04T11:54:34+5:30
संसर्गाचा धोका वाढला : प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आक्षेप
जळगाव : जळगाव रेल्वेच्या मालधक्क्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहचला असून एका हुंडेकऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे़ या आधीही एक एजंट बाधित आढळून आला होता़ मोठ्या प्रमाणावर हमाल बांधव व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असताना रेल्वे प्रशासनाने मात्र, कुठल्याही तपासणी किंवा या ठिकाणी साधी फवारणीही केली नसल्याचा मुद्दा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मालधक्क्यावर अधिकारी ते कर्मचारी असे १२जण तसेच ६० ते ७० हमाल कार्यरत आहेत़ यासह ७ ते ८ कार्टीन एजंट आहेत़ लॉकडॉऊनमध्येही हे सर्व सतत कर्तव्यावर कार्यरत आहेत़ दरम्यान, २५ जून रोजी यातील एक ३८ वर्षीय कार्टीन एजंट बाधित आढळून आला होता़ त्यानंतर कुटुंबालाही बाधा झाल्याचे समोर आले होते़ त्यानंतर २९ जून रोजी एक ५९ वर्षीय एजंट बाधित आढळून आला़ या एजंटचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे़ हे दोघही एजंट अधिकारी, कर्मचारी तसेच हमाल बांधवांच्या संपर्कातही आलेली असल्याची शक्यता असताना त्यादृष्टीने प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत, काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या कानावरही या बाबी टाकल्या. मात्र, उपाययोजना झालेल्या नसल्याचे सांगितले जात आहे़
मालधक्क्यावरील कर्मचारी आपल्याकडे आले होते. त्यांची तक्रार वरिष्ठांकडे कळविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माल धक्का बंद करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.
- अमरचंद अग्रवाल, रेल्वे स्टेशन प्रबंधक, जळगाव.