संत सखाराम महाराज यात्रेवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:37 PM2021-05-12T22:37:23+5:302021-05-12T22:38:48+5:30
संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बोरी नदीचे वाळवंट रिक्त राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : यंदाही संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बोरी नदीचे वाळवंट रिक्त राहणार आहे. मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अक्षय तृतीयेला स्तंभरोपण, जागेवरच रथपूजा, समाधी मंदिराला पालखीची प्रदक्षिणा घालण्यात येणार असून भाविकांनी गर्दी करू नये. त्यांच्यासाठी हा सोहळा ऑनलाईन करण्यात येणार असून त्यांनी ऑनलाईन लाभ घ्यावा, असे आवाहन संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी केले आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेपासून वाडी संस्थानतर्फे बोरी नदीपात्रात संत सखाराम महाराज यात्रोत्सव साजरा होत असतो. नदीपात्रात पाळणे, फुगे, काकड्या, खाद्यपदार्थ वस्तू, मौत का कुवा, विविध मनोरंजनाची खेळणी, जादूचे प्रयोग, घरगुती वस्तूंची दुकाने, मीना बाजार, महिलांच्या विविध आभूषणाची दुकाने, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, उसाचा रस, आईस्क्रीम अशी दुकाने थाटलेली असतात. संपूर्ण बोरी नदी परिसर लायटिंग रोषणाईने नटलेला असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक रथ आणि पालखी मिरवणुकीला हजेरी लावत असतात. मात्र सतत दुसऱ्या वर्षीदेखील कोरोनाने कहर मांडला असून शासनाने यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने यंदाही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
परंपरेप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत १४ मे रोजी अक्षय तृतीयेला सकाळी साडेनऊ वाजता वाडी संस्थानमध्ये स्तंभारोपण, पूजा करण्यात येईल. त्यांनतर दशमीला २२ रोजी बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होत असते. मात्र यंदाही बेलापूरकर महाराज चारचाकी वाहनाने अमळनेरला येतील व समाधीवर त्यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. २३ रोजी एकादशीला संध्याकाळी साडेसात वाजता रथोत्सव असतो. गेल्या वर्षाप्रमाणे गावातून मिरवणूक न काढता रथाला बाहेर काढून धुण्यात येईल. वाडी संस्थानमध्ये लालजींची मूर्ती ठेवून पूजा करून पाच पावले रथ ओढून पुन्हा जागेवर विसर्जन करण्यात येईल.
द्वादशीला २४ रोजी अंबर्शी टेकडीवर बेलापूरकर महाराज यांचा खिरापतीचा कार्यक्रम होईल. त्रयोदशीला २५ रोजी गरुड हनुमंताचे वहन असते. मात्र याच दिवशी कृतीकाक्षय असल्याने पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल. पुण्यतिथीला दरवर्षी सव्वा पाच पोत्यांचा भात करून त्याची पूजा करून रात्री लोकांना प्रसाद वाटप केला जातो. यावर्षीही मात्र फक्त सव्वा पोत्याचा भात केला जाईल. रथाच्या पाचव्या दिवशी पौर्णिमेला पालखी मिरवणूक असते. मात्र यंदा प्रतिपदेला पालखी सोहळा होईल. मात्र मिरवणूक न काढता सकाळी ६ वाजता पूजा करून बोरी नदी पात्रात समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून तेथेच विसर्जन करण्यात येईल.
मोजक्या लोकांमध्ये भजन, काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रम होतील. कोरोनामुळे कोणत्याही भाविकांनी गर्दी करू नये. त्यांच्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येणार आहे असे आवाहन प्रसाद महाराजांनी केले आहे.