coronavirus: कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:49 PM2020-06-10T23:49:40+5:302020-06-10T23:53:41+5:30
मालती नेहते या १ जून रोजी ४.३० वाजता भुसावळ रेल्वे दवाखान्यातून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला व त्यात त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र २ जून रोजी मालती नेहते या रुग्णालयातून निघून गेल्याची नोंद होती.
जळगाव - कोरोनाबाधित मालती चुडामण नेहते (८२) या वृध्देच्या मृत्यूप्रकरणी सामान्य रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्र. ७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉय व इतर संबंधित अधिकारी व कर्मचाºयांविरुध्द रात्री दहा वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णालयाचे विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील चंद्रकांत कळसकर (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मालती नेहते या १ जून रोजी ४.३० वाजता भुसावळ रेल्वे दवाखान्यातून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला व त्यात त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र २ जून रोजी मालती नेहते या रुग्णालयातून निघून गेल्याची नोंद होती. त्याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कळविण्यात आले होते. बुधवार दि.१० रोजी वैद्यकिय अधिकारी म्हणून ड्युटीला असताना डॉ.किरण पाटील यांनी वॉर्ड क्र. ७ मध्ये बोलावले असता तेथील स्वच्छतागृहात एक महिला मृतावस्थेत आढळून आलेली होती. याबाबत पोलिसांना कळविले असता ही महिला मालती नेहते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस रुग्णालयाच्या वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून त्यांनी कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अकबर पटेल करीत आहेत.
गुन्हा दाखल होईपर्यंत डॉ.रोहन पोलीस ठाण्यात
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीनंतर मालती नेहते यांच्या मृत्यूबाबत जबाबदारी निश्चित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. वॉर्ड क्र.७ मधील संपूर्ण स्टापविरुध्द ठपका ठेवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील कळसकर यांना प्राधिकृत करण्यात आले. कळसकर यांच्यासह डॉ.किरण पाटील व डॉ.दत्तात्रय बिराजदार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन हे देखील दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतरच डॉ.रोहन यांनी पोलीस ठाणे सोडले.