CoronaVirus : जळगावात चिंता वाढली, दोन संभाव्य कोरोना बाधितांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:21 AM2020-04-05T11:21:57+5:302020-04-05T11:38:44+5:30
coronavirus : ३१ मार्च रोजी याच कक्षात दाखल एका संभाव्य कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. मात्र नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संभाव्य कोरोना बाधित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा शनिवारी मध्यरात्री उशिरा मृत्यू झाला. दोघांचे अहवाल अद्याप यायचे असल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, यापूर्वीही मंगळवार, ३१ मार्च रोजी याच कक्षात दाखल एका संभाव्य कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. मात्र नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
त्यानंतर आता पुन्हा शनिवारी रात्री दोन संभाव्य कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता येत नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली.
सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक कोरोना बाधित रुग्ण दाखल आहे. तसेच एका कोरोना बाधित रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला.