Coronavirus: ऑक्सिजनची पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ‘ती’ परतली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:34 AM2021-05-28T08:34:38+5:302021-05-28T08:34:53+5:30
Coronavirus: वाचणे कठीण असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८. पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) यांनी जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले.
- संजय पाटील
अमळनेर - खासगी दवाखान्यात उपचार सुरू होऊन १९ दिवस उलटले होते. कोरोना मानगुटीवर बसला होता. वाचणे कठीण असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८. पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) यांनी जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले.
राजकोरबाई यांना कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस उपचार करण्यात आले मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुसरीकडे खासगी दवाखान्यातील खर्च परवडत नव्हता. अखेर डॉक्टरांनी आशा सोडल्यावर नातेवाईकही हतबल झाले. त्यांचे भाऊ अशोक कोळी व इतरांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना विनंती केली की, ऑक्सिजन लावा.
महिनाभरपूर्वीची २६ एप्रिलची ती वेळ होती. या काळात अमळनेरात बेड उपलब्ध नव्हते, प्रशासनाने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले. राजकोरबाईचा ऑक्सिजन फक्त ३८ आणि एचआरसीटी स्कोअर १९ आणि उच्च रक्तदाब होता तो वेगळाच.
रुग्णाला वाचविण्यासाठी डॉ. प्रकाश ताडे, डॉ. आशिष पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील, सर्व कर्मचारी आणि परिचारिकांनी अथक प्रयत्न केले. डॉक्टरांनी बायपॅप मशिन लावले. हाय फ्लो ऑक्सिजन लावला. हळूहळू त्या प्रतिसाद देऊ लागल्या.
राजकोरबाईंनीही जगण्याची जिद्द ठेवली. ग्रामीण रुग्णालयात ३१ दिवसांनंतर महिलेचा ऑक्सिजन ९५ ते ९६ आला ५० दिवस कोरोनाशी लढून राजकोरबाई घरी परतल्या. सर्वांनी गेटवर येऊन त्यांना कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटुंबीयांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.