CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:02 AM2020-04-20T02:02:34+5:302020-04-20T02:04:13+5:30

दागिन्यांची मोड नाही की तारण नाही; ऐन शेती मशागतीच्या काळात हाती पैसा नसल्याने चिंता

coronavirus farmers facing critical situation as gold market closed due to lockdown | CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

Next

जळगाव : लॉकडाऊन दरम्यान सुवर्णबाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यवसायिकांसह बळीराजालाही बसत आहे. शेती मशागतीसाठी घरातील दागिन्यांची मोड करणे वा ते तारण ठेवून पैसा उभा करण्याचे साधन असलेल्या सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.

कोरोनामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था अस्थिर झाली असताना भारताचीही तीच स्थिती आहे. शेतीदेखील संकटात सापडली आहे. खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या काळातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने ही कामे ठप्प झाली आहे. या कामासह बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेऊन आपली कामे करीत असतो. या सोबतच मिळणाºया कर्जात शेतीकामांचा खर्च भागणे शक्य नसल्याने शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोने-चांदीचे दागिने मोडून अथवा तारण ठेवून पैसा उभा करतो.

घरात बसण्याशिवाय पर्याय नाही
कापूस असो की इतर रब्बी हंगामातील माल विकता येत नाही. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने दागिन्यांची मोड करता येत नाही की ते तारण ठेवता येत नाही. त्यामुळे बळीराजाला घरातच बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.

जास्त भाव असूनही मोड करता येईना
कधी नव्हे एवढ्या उच्चांकीवर सोन्याचे भाव पोहोचल्याने शेतकऱ्यांना मोड करताना फायदा होणार होता. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव ४२ हजार ते ४४ हजारादरम्यान राहिले. त्यामुळे त्याचा फायदा मोड करताना झाला असता व बळीराजाच्या हाती अधिक पैसा पडला असता. मात्र, यंदा सुवर्णपेढ्याच बंद असल्याने ना मोड, ना जास्त भावाचा फायदा करता आला नाही.

खरेदी व मोडचा हंगाम
एप्रिल-मे महिन्यात मशागतीसह लग्नसराईदेखील असते. त्यामुळे लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होते. शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळाले तरी, ते हजारात असते व शेताला खर्च लाखात लागतो, त्यामुळे दागिने मोडसाठी शेतकरी सुवर्णपेढ्याकडे जातो. परिणामी, सुवर्णबाजारात दुहेरी उलाढाल या काळात होत असते.

शेतीच्या अर्थकारणासाठी दुकानांना वेळ ठरवून द्या
२० एप्रिलपासून सरकार विविध क्षेत्रातील कामांना सुरुवात करण्याचे संकेत देत आहे. त्यात शेतीशी निगडित अनेक कामे आहे. सुवर्णपेढ्याही सुरू करण्याची मागणी शेतकºयांसह सुवर्ण व्यावसायिकदेखील करीत आहेत. यासाठी वेळा निश्चित करून दिल्या तरी शेतकºयांना मोठा आधार होईल व शेतीचे अर्थकारण सुरू होईल, असाही सूर उमटत आहे.

एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी असतेच. सोबतच शेती मशागतीच्या कामासाठीदेखील शेतकरी त्यांच्याकडील दागिने विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या दिवसात ही दुहेरी उलाढाल होते. मात्र, यंदा सुवर्णपेढ्या बंद असल्याने हे सर्व व्यवहार ठप्प आहेत.
- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन.

कापूस तसेच इतर पिके पडून आहे. त्यात सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकºयांना दागिने विकता वा तारण ठेवता येत नसल्याने शेती मशागतीसाठी पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न पडला आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, असोदा, ता. जळगाव.

Web Title: coronavirus farmers facing critical situation as gold market closed due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.