CoronaVirus News : आदित्य फार्म आणि डी-मार्टला कोरोना नियमांचं उल्लंघन करणं भोवलं; प्रत्येकी ५० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:13 PM2022-01-31T17:13:54+5:302022-01-31T17:23:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: एमआयडीसी भागातील आदित्य फार्म व डी-मार्टवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जळगाव - कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना, दुसरीकडे शहरातील गर्दी देखील वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असून, या प्रकरणी मनपाच्या पथकाकडून शहरातील एमआयडीसी भागातील आदित्य फार्म व डी-मार्टवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच याबाबत मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून संबंधित आस्थापनांच्या प्रमुखांना नोटीस बजावून कारवाई का करण्यात येऊ नये? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्न समारंभामध्ये २०० पेक्षा अधिक जणांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मोठ्या सुपरशॉपी व दुकानांमधील गर्दीबाबत नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. एमआयडीसी परिसरातील आदित्य फार्ममध्ये २७ जानेवारी एका कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाच्या पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.ट
मनपाच्या पथकाकडून पाहणी केली असता, याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली. तसेच डी-मार्टमध्येही मनपाच्या पथकाने पाहणी केली असता, याठिकाणी ४०० पेक्षा अधिक नागरिक असल्याचे आढळून आले. याबाबत दोन्ही आस्थापनांना मनपाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडाबाबतची नोटीस बजावली आहे. तसेच दोन्ही आस्थापना सील का करण्यात येऊ नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.
मनपाकडून ५० लाखांची वसुली
कोरोनाच्या काळात जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून मनपा प्रशासनाने आतापर्यंत ५० लाखांची वसुली केली आहे. यामध्ये गर्दीचे नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन्सकडून सर्वाधिक २० लाखांची वसुली झाली आहे. तर लॉकडाऊन काळात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून, त्यांच्याकडून १२ लाखांची वसुली करण्यात आली आहे.