coronavirus: भुसावळात चक्क महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल, नातेवाईकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 05:16 AM2020-09-05T05:16:31+5:302020-09-05T05:17:16+5:30
मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनीतील निगेटिव्ह महिलेस कोरोना संशयित म्हणून तिचा मृतदेह सरळ कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी आणण्यात आला होता. मात्र शेवटची इच्छा म्हणून तिचा पाहिला असता चक्क मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे निदर्शनास आल्याने नातेवाईकांनी प्रशासनावर एकच संताप व्यक्त केला.
मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, हा मृतदेह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात सुपूर्द करून मूळ मृतदेह ताब्यात घेत, त्याचे मुस्लीम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याने तणाव निवळला.
रेल्वे रुग्णालयातून कोविड सेंटरला हलवले
येथील मुस्लीम कॉलनीतील फातिमा समद पिंजारी या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तीन दिवसांपूर्वी भुसावळातील रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेस डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये हलविले. त्यानंतर ३ रोजी रात्री महिलेच्या नातेवाईकांना गोदावरी रुग्णालयातून ही महिला मृत झाल्याचे दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. ४ रोजी सकाळी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगत याचे शासकीय निकष पाळून रितीरिवाजानुसार दफन करण्याच्या सूचना तेथील अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार महिलेच्या नातेवाईकांनी हा मृतदेह दफनभूमीत नेला. त्याठिकाणी मयत महिलेचा चेहरा उघडून पाहिला असता मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले.