बॅण्डच्या सुरावटींमध्ये ‘कोरोनाष्टके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:53 PM2020-04-04T14:53:09+5:302020-04-04T14:55:40+5:30
यंदा मात्र सोहळ्यांच्या हंगामात बॅण्डचे हवेहवेसे वाटणारे सूर जणू ‘कोरोनाष्टके’ झाल्याने सन्नाटा पसरला आहे.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावच्या बॅण्डचे ‘निरागस’ सूर निनादले की, भल्याभल्यांना थिरकण्याचा मोह आवरता येत नाही. समारंभ कोणताही असो क्षण झंकारून निघतात. चाळीसगावच्या याच बॅण्ड वादक कलावंतांनी देशभर आपली कला पोहचवली आहे. यंदा मात्र सोहळ्यांच्या हंगामात बॅण्डचे हवेहवेसे वाटणारे सूर जणू ‘कोरोनाष्टके’ झाल्याने सन्नाटा पसरला आहे. सूरांवर ‘पोट’ भरणाºया तीनशे वादक कलावंतांच्या कुटुंंबांवर उपासमारीचा वरवंटा फिरला आहे. विवाह सोहळे रद्द होऊन लागल्याने हे बॅण्ड वादक पुरते हतबल झाले आहे.
चाळीसगावच्या बॅण्ड पथकांना दिडशे वर्षांची परंपरा आहे. १९९५ पर्यंत बॅण्डसाठी वैभवाचा काळ होता. पुढे बॅन्जो आणि त्यानंतर डीजेच्या दणदणाटात बॅण्डचे सूर काहीसे दाबले गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून डीजे वाजविण्यावर आलेल्या निबंर्धामुळे बॅण्ड पथकांची मागणी वाढली आहे. साधारण वर्षांचे नऊ महिने विवाहे सोहळे होतात. हाच बॅण्ड पथकांचा 'मुख्य सीझन' यंदा मात्र कोरोना आजारासह देशव्यापी संचारबंदीमुळे बॅण्ड पथकांचा रोजगार हिसकावला गेला आहे. त्यांच्यावर अवलंबून असणाºया कुटुंंबांचेदेखील हाल होत आहे. तमाशा कलावंतांप्रमाणेच मानधन मिळावे, अशी मागणी गेल्या १० वर्षांपासून बॅण्ड कलावंत करताहेत.
दरमहा सहा ते सात हजार उत्पन्न
बॅण्ड पथकांसाठी तेजी सीझन म्हणजे विवाह सोहळ्यांची धूम. चाळीसगावी एकूण सात बॅण्ड पथके आहेत. यात ३०० वादक कलावंतांच्या कुटुंंबांचा उदरनिर्वाह होतो. एका भरगच्च सीझनमध्ये प्रत्येक वादकाला ७५ हजार रुपये मिळतात. त्यामुळे हे मासिक उत्पन्न पाच ते सहा हजारांपर्यंत पोहचते. उर्वरित तीन महिने हे वादक वेगवेगळी कामे करतात. बॅण्ड वादनामुळे त्यांना श्वसनाचे आजारही लवकर जडतात.
यावर्षी कोरोनामुळे मार्च ते जूनमधील बॅण्ड पथकांकडे नोंदणी झालेल्या विवाह सोहळ्यांचा बहुतांशी तारखा रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रत्येक वादक कलावंताचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सातही पथके सद्य:स्थितीत घरी बसून आहेत.
देशभर चाळीसगावच्या बॅण्डचे सूर
शास्त्रीय संगीताची ‘जोड’ हा चाळीसगावच्या बॅण्डचा वेगळा पैलू आहे. त्यामुळे राज्याची उपराजनाधी नागपूर असो की राजधानी मुंबई चाळीसगावच्या बॅण्ड तालावर सर्वांचीच पावले थिरकतात. नागपुरात तर दरवर्षी दोन पथके नऊ महिन्यांच्या सीझनसाठी बुक असतात.
ओडिसातील झारतुकडा, कर्नाटकाती विजापूर, गुराजरातमधील सुरत, अहमदाबाद, बडोदा, तामिळनाडूतील चेन्नई, मध्य प्रदेशातील इंदूर, बºहाणपूर आदी ठिकाणी ही पथके दरवर्षी जातात. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे ‘सूर आणि ताल’ यांचेही ‘लॉकडाऊन’ झाल्याने बॅण्ड पथकातील ३०० कलावंत आणि त्यांचे कुटुंंबे हताश झाली आहे.
चाळीसगावच्या बॅण्ड पथकांचा लौकिक देशभर असल्याने आमचा सीझन दरवर्षी ‘फुल्ल’ असतो. यावर्षी मात्र कोरोनामुळे उपासमारीचे संकट ओढावले आहे. चार महिन्यांचा सीझन बुडाला आहे. तमाशा कलावंतांप्रमाणे आम्हालाही शासकीय मानधन मिळावे, अशी १० वर्षांपासून मागणी करतो आहे. दखल मात्र घेतली गेली नाही. आपत्तीच्या काळात तरी मदत मिळावी, अशी शासनाकडून अपेक्षा आहे.
- विजय गुरव, प्रमुख, सद्गुरू बॅण्ड पथक, चाळीसगाव