कॉर्पोरेट टॅक्स ‘इफेक्ट’ : सोन्याचे दर ‘जैसे थे’ राहणार, मात्र आभूषण निर्मात्यांना होणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:19 PM2019-09-21T12:19:17+5:302019-09-21T12:19:42+5:30
घोषणेनंतर सोने १०० रुपयांनी वधारले
जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचा सुवर्ण व्यावसायावर नव्हे तर व्यावसायिकांच्या लाभावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टॅक्स कमी केला असली तरी सोने-चांदीचे भाव कमी होणार नसून केवळ सुवर्ण आभूषणे तयार करणाऱ्या उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. कर कमी करण्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारून ३७ हजार ८०० रुपयांवर पोहचले तर चांदी ४७ हजार ५०० रुपयांर स्थिर आहे.
भारतात सुवर्ण आभूषणांनाही मोठे महत्त्व असल्याने या व्यवसायातही मोठी उलाढाल होत असते. त्यात सुवर्णनगरी जळगावात हा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींचा कर भरण्यात मोठा हातभार असतो.
त्या अनुषंगाने कार्पोरेट टॅक्स कमी केल्याच्या घोषणेनंतर सोने-चांदी व्यवसायाचा आढावा घेतला असता याचा या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नसल्याचे सुवर्ण व्यावसायिक व या क्षेत्रातील जाणकार ईश्वरलाल जैन यांनी सांगितले. ते म्हणाले की, वर्ष अखेर आयकर भरताना त्यावर लागणाºया कार्पोरेट टॅक्समध्ये ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वेळी हा कर भरला जाईल, त्या वेळी त्याचा लाभ व्यावसायिकांना होणार आहे. मात्र तोदेखील सर्व सुवर्ण व्यावसायिकांना नाही तर जे आभूषण तयार करतात, त्यांनाच हा लाभ होणार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांना लाभ देणे अशक्य
व्यावसायिक वर्षअखेरीस जो कर भरतात त्यात ही सूट असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना मिळणे शक्य नसल्याचे जैन म्हणाले. जळगावात दीडशेच्यावर सुवर्ण पेढ्या असल्या तरी आभूषण निर्माते केवळ आठच आहेत. त्यामुळे ग्राहकांना इतर सुवर्ण व्यावसायिक लाभ देऊ शकत नाही.
जीएसटी, सीमा शुल्क कमी केल्यास लाभ
सोन्यावरील जीएसटी व सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) कमी केलेअसते तर सोन्याचे भाव कमी झाले असते व त्याचा ग्राहकांना लाभ झाला असता, असे सांगण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्क वाढविल्याने सोन्याचे भाव वाढले होते. मात्र शुक्रवारी कार्पोरेट टॅक्स कमी केला असला तरी सोन्याचे भाव १०० रुपयांनी वाढून ते ३७ हजार ७००वरून ३७ हजार ८००वर गेले.
छोट्या पाईप उद्योगांना मिळणार चालना
जळगावात सुवर्ण व्यवयासासह पाईप उद्योगही मोठा आहे. पाईपच्या दोन मोठ्या व १० प्रा.लि. कंपन्या जळगावात असून कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने त्याचा लाभ मोठ्या कंपन्यांना होणार आहे. मात्र इतर प्रा.लि. कंपन्यांना त्याचा लाभ होणार नसला तरी मोठ्या कंपन्यांमुळे या कंपन्यांना चालणा मिळू शकते, असा विश्वास लघु उद्योग भारतीचे सल्लागार अंजनीकुमार मुंदडा यांनी सांगितले. त्यामुळे या निर्णयाचे पाईप उद्योगातूनही स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले.
कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने मंदावलेल्या डाळ उद्योगांना येईल भरारी
जळगाव : कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने देशातील ४० टक्के डाळीचे उत्पादन असणाºया जळगावातील दालमिलला मोठा लाभ होणार आहे.
उद्योग जगतातील मंदीचा फटका दालमिललाही बसण्यासह निसर्गाच्या लहरीपणामुळे कडधान्याचे उत्पादन घटल्याने दालमिलच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. मात्र आता हा कर कमी केल्याने जळगावातील ६५ दालमिलला नक्कीच फायदा होऊन उद्योग वाढीस चालना मिळणार असल्याचे जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी सांगितले.
कार्पोरेट टॅक्स कमी केला असला तरी त्याचा ग्राहकांना लाभ होणार नाही. सुवर्ण आभूषणे निर्मात्यांनाच याचा लाभ होणार आहे.
-ईश्वरलाल जैन, सुवर्णव्यावसायिक,जळगाव
कार्पोरेट टॅक्स कमी केल्याने सर्वांनाच फायदा होणार असून उद्योग वाढ होऊ शकेल व अर्थव्यवस्था स्थिर होण्यासही हातभार लागणार आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन