मनपाच्या शुल्क आकारणीत होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:30+5:302021-02-26T04:22:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाकडून गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात कुठल्याही प्रकारची करवाढ सूचविली नाही. मात्र, मनपाकडून ...

Corporation charges will be increased | मनपाच्या शुल्क आकारणीत होणार वाढ

मनपाच्या शुल्क आकारणीत होणार वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा प्रशासनाकडून गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात कुठल्याही प्रकारची करवाढ सूचविली नाही. मात्र, मनपाकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखले व उतारे तसेच हस्तांतरणाच्या सेवा देतांना आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. तसेच अमृत, मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांवर मलप्रवाह कर नव्याने लागू करण्याचे संकेतदेखील मनपा आयुक्तांनी गुरुवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकात दिले आहेत.

महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात मालमत्ता करवसुलीवर जास्त भर देण्यात आला आहे. तसेच गाळेधारकांबाबत कारवाईसाठी आयुक्तांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने उत्पन्न वाढीसाठी मनपा प्रशासन सक्तीचे नियोजन करण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अंदाजपत्रक सादर करतांना आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केलेल्या निवेदनात शहरवासीयांना किमान नागरी सुविधा देण्याचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. मनपाच्या महसुली उत्पन्नावर भर देऊन ते पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक खासगी भागीदारीतून बसविण्यात येतील वॉटर मीटर

शहरातील अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी आवश्यक असलेले वॉटर मीटरसाठी लागणारा खर्च सार्वजनिक खासगी भागीदारीतून तयार करण्यात येणार आहे. तसेच अमृत अंतर्गत मिळणाऱ्या पाण्यावर वॉटर मीटर बसविल्यानंतर व अनधिकृत नळ कनेक्शनदेखील बंद केले जाणार असल्याने येणाऱ्या काळात मनपाला पाणीपट्टी कराच्या रकमेतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

खुला भूखंड कर वसुली विभाग बंद होणार

शहरातील खुल्या भूखंडावरील कर वसुलीसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडून खुल्या भूखंडधारकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कराची वसुली केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही वसुली व्यवस्थित होत नसल्याने आता हा विभाग बंद केला जाणार असून, मालमत्ताकर विभागाकडेच हे वसुलीचे काम देण्यात आले आहे.

असा येईल रुपया (उत्पन्नाची जमा बाजू )

आरंभीची शिल्लक- २९८ कोटी ४४ लाख

महसुली जमा- ३६३ कोटी ५४ लाख रुपये

भांडवली जमा-३९९ कोटी ३६ लाख रुपये

असाधारण देवघेव-५६ कोटी ८ लाख रुपये

पाणीपुरवठा- ४५ कोटी ५२ लाख रुपये

मलनिस्सारण- ६ कोटी ७५ लाख रुपये

एकूण जमा-११६९ कोटी ७० लाख रुपये

असा जाईल रुपया (खर्चाची बाजू )

अखेरची शिल्लक- १० कोटी ४३ लाख रुपये

महसुली खर्च- ४२३ कोटी ५५ लाख रुपये

भांडवली खर्च ६०६ कोटी ८८ लाख रुपये

असाधारण देवघेव- ७६ कोटी ३२ लाख रुपये

परिवहन- ३७ हजार

पाणीपुरवठा- ४५ कोटी ७४ लाख रुपये

एकूण खर्च- ११६९ कोटी ७० लाख रुपये

Web Title: Corporation charges will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.