शासनाच्या आदेशाविरोधात मनपा कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:33+5:302021-09-25T04:16:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तत्कालीन नगरपालिकेत झालेल्या उड्डाण पदोन्नतीबाबत शासनाने मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचा विरोधात मनपा कर्मचाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तत्कालीन नगरपालिकेत झालेल्या उड्डाण पदोन्नतीबाबत शासनाने मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचा विरोधात मनपा कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत शुक्रवारी बहिणाबाई उद्यानात मनपा अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शासनाने दिलेल्या एकतर्फी आदेशाविरोधात अधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला असून, शासनाच्या निर्णयाचा निषेध म्हणून शनिवारपासून मनपाच्या शासकीय बैठकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
बहिणाबाई उद्यानात कर्मचारी व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील, विलास सोनवणी, शहर अभियंता अरविंद भोसले, राजेंद्र पाटील, सुनील भोळे, एस.एस.पाटील, संजय पाटील, शकील शेख यांच्यासह मनपाचे इतर अधिकरी उपस्थित होते. मुळ लेखा परीक्षण अहवाल व शासनाच्या आदेशात तफावत असून, शासनाने काढलेले आदेश चुकीचे असल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनपाचे तत्कालीन कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. तर अनेक अधिकारी मृत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आता कोणतेही कारण नसल्याची भूमिका मनपा अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
शासनाच्या आदेशात बदल झाला कसा ?
१. २०१९ मध्ये लेखा परीक्षण झाल्यानंतर लेखा परीक्षण अहवालात उड्डाण पदोन्नती झाल्याबाबत तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्षांवर कारवाई करण्याबाबत ठपका ठेवला होता. तर मनपा कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्याचा अहवाल शासनाकडे ठेवला होता.
२. मात्र, शासनाने काढलेला आदेश हा लेखा परीक्षण अहवालाच्या विपरीत असून, यामध्ये शासनाने शासनाच्या अधिकाऱ्यांचा बचाव करत, सर्व खापर मनपा कर्मचाऱ्यांवर फोडले आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा बचाव करून, मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा का उगारण्यात येत असल्याचा प्रश्न मनपा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मनपा आयुक्तांनी आदेश काढल्यास, मनपा कर्मचारी काम करणार नाही
लेखा परीक्षण अहवालात मनपातील १२०० कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे मनपा आयुक्तांनी कारवाई केल्यास एकही मनपा कर्मचारी महापालिकेत काम करणार नाही असा इशारा मनपा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी मनपा कर्मचाऱ्यांची बैठक घेतली जाणार असून, या बैठकीत सर्व विभागप्रमुखांसोबतच सर्व कर्मचारी संघटनेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेच्या कामकाजावर होणार परिणाम
१. मनपा अधिकाऱ्यांनी बंद पुकारण्यासोबतच शासकीय बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
२. शनिवारी बांधकाम विभागाकडून काढण्यात येणाऱ्या निविदांबाबतच्या बैठकीवर अभियंते गैरहजर राहणार आहेत.
३. नगररचना विभागातील बांधकाम परवानगी रखडणार
४. आरोग्य यंत्रणेसह कोरोनावरील उपाययोजना, लसीकरणावर देखील होणार परिणाम
५. स्थायी समिती, मनपा महासभांवरदेखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
६. मनपातील पदाधिकाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांचा बचावासाठी महापालिकेत ठराव आणण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली.
कोट..
शासनाच्या या निर्णयावर पालकमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार असून, त्यांच्यामाध्यमातून नगरविकास मंत्रालयामार्फत शासनाच्या निर्णयावर स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मनपा कर्मचाऱ्यांनी चांगल्याप्रकारे सेवा बजावली असून, मनपातील पदाधिकारी मनपा कर्मचाऱ्यांचा पाठीशी आहे.
-जयश्री महाजन, महापौर