रस्त्यावर पार्किंग करणा-यांना मनपाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:46+5:302021-06-11T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महानगर पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी शहरातील विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगर पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी शहरातील विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. २२ ते २४ हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच फुले मार्केट परिसरात रस्त्यावर वाहन पार्किंग करणा-या वाहनधारकांना मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चांगलाच दणका दिला आहे. यावेळी ४६ वाहने जप्त करुन वाहतूक पोलीस विभागाच्या स्वाधीन करण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
फुले मार्केटसह, बळीरामपेठ, सुभाष चौक यासह का.ऊ. कोल्हे विद्यालयाच्या समोर हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. फुले मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने तसेच, का.ऊ.कोल्हे विद्यालयाच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने मनपा प्रशासनातर्फे कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यावेळी २२ ते २४ हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलीस व मनपाचे पथक फुले मार्केटमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे फुले मार्केटने मोकळा श्वास घेतला होता. तसेच फुले मार्केट परिसरात नो पार्किंग झोन केला असताना देखील त्या ठिकाणी वाहने लावणा-या वाहनधारकांवर देखील मनपाकडून दंड करण्यात आला. दरम्यान, मनपाने बुधवारी केलेल्या कारवाईमुळे फुले मार्केट परिसरात गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला.