मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाचा नवीन मालमत्ता व्यवस्थापन विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:10+5:302021-04-16T04:15:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अंदाजपत्रकात महापालिकेचा नवीन आर्थिक वर्षापासून मालमत्ता कराचा वसुलीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अंदाजपत्रकात महापालिकेचा नवीन आर्थिक वर्षापासून मालमत्ता कराचा वसुलीसाठी नवीन मालमत्ता व्यवस्थापन विभाग सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १ एप्रिलपासून मालमत्ता व्यवस्थापन विभाग सुरू झाला असून, या विभागामार्फत कामकाजाला सुरुवात झाली असल्याची माहिती मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मनपाचे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात वाढीसाठी काही नवीन घोषणा आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार शहरातील मुदत संपलेले मार्केटमधील गाळेधारकांकडील असलेली थकबाकी, इतर मार्केटमधील थकबाकी, हॉकर्सकडून होणारे वसुली यासाठी मनपात स्वतंत्र विभाग आहेत. मात्र, मालमत्ताकराची वसुलीवगळता इतर कर व भाड्यांची वसुलीसाठी मनपात मालमत्ता व्यवस्थापन विभाग सुरू करण्यात आला आहे. महापालिकेत मालमत्ता व्यवस्थापन हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. मनपा मालमत्तांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे तसेच उत्पन्नात भर पडावी, त्याचे व्यवस्थापन एकाच विभागाद्वारे करणे शक्य व्हावे व कामकाज प्रभावीपणे करण्यासाठीच हा विभाग तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी काढलेले आदेश जारी केले आहेत. या विभागाचे प्रमुख म्हणून मालमत्ता व्यवस्थापक काम पाहणार आहेत. पालिकेतील सध्याच्या मार्केट वसुली, किरकोळ वसुली विभागातील कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येणार आहे. सध्याचे कार्यकारी कर अधीक्षक यांच्यावर मिळकत व्यवस्थापक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील सर्वच व्यापारी संकुले, मनपाच्या सर्व प्रकारच्या मालमत्तांचे व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार आहे. प्लॅाटच्या लेआउटमधील ओपन स्पेसबाबतची कार्यवाही नगररचना विभागामार्फतच करण्याचे आदेशात म्हटले आहे तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने वितरित करण्याचे व व्यवस्थापनाचे काम बांधकाम विभागामार्फतच केले जाणार आहे.
खुला भूखंड करवसुली विभाग बंद होणार?
शहरातील खुल्या भूखंडावरील करवसुलीसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडून खुल्या भूखंडधारकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कराची वसुली केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही वसुली व्यवस्थित होत नसल्याने आता हा विभाग बंद केला जाणार असून, मालमत्ताकर विभागाकडेच हे वसुलीचे काम देण्यात येणार आहे. दरम्यान, नगररचना विभाग व बांधकाम विभाग यांच्याकडील मालमत्तांचे कागदपत्रे, फाइल्स आदी माहिती तातडीने हस्तांतरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालमत्तांची कायमस्वरूपी मालमत्ता नोंदवही तयार करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक मालमत्तेचे नाव, ठिकाण, पत्ता, सर्व्हे नंबर, आरक्षण क्रमांक, क्षेत्रफळ, मालमत्ता कोणत्या पद्धतीने प्राप्त झाली यासह सविस्तर माहिती नमूद केली जाणार आहे.
कोट
मालमत्ता व्यवस्थापन विभाग नव्याने सुरू होत असून, यासाठी अन्य विभागांकडील मालमत्तांच्या माहितीचे हस्तांतरण सुरू आहे. नवीन विभाग सुरू झाल्यानंतर मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करता येणार आहेत.
- प्रशांत पाटील, उपायुक्त