कोट्यवधीच्या जे.के.पार्कच्या जागेकडे मनपाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:43+5:302021-01-01T04:11:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मेहरूण तलाव परिसरात शिवाजी उद्यानातील १८१ चौ.मी जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला दिली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मेहरूण तलाव परिसरात शिवाजी उद्यानातील १८१ चौ.मी जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला दिली होती. या जागेची मुदत २५ डिसेंबर २०१९ रोजी संपली आहे. तरी ही जागा मनपाने ताब्यात घेतलेली नाही. विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त उदय टेकाळे यांनी जानेवारी २०२० मध्ये आदेश काढून ही जागा ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आदेश देऊन ११ महिने झाले असतानाही मनपाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी मनपा प्रशासनाला पुन्हा स्मरणपत्र पाठवत ही जागा ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.
जे.के.पार्कसह अनेक कोट्यवधीच्या मनपा मालकीच्या जागाकडे मनपा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. जे.के.पार्कच्या जागेची मुदत संपली आहे. मात्र, मुदत संपून आता वर्षपूर्ती झाली आहे. तरीही मनपा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतलेली नाही. मनपा प्रशासनाची नेहमीची भूमिका पाहता केवळ हॉकर्स व सर्वसामान्य विक्रेत्यांनाच टार्गेट केले जात आहे. बेसमेंटचा अवैध वापर करणारे असो वा बडे थकबाकीदार यांना मनपा प्रशासनाकडून अभय दिले जात आहे. तर दुसरीकडे बड्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसताना दिसून येत आहे. जे.के.पार्कची जागा ताब्यात घेऊन ही जागा विकसित केली तर मनपाला उत्पन्नाचा मोठा स्त्रोत मिळू शकतो. मात्र, मनपा प्रशासन गांभीर्याने घेताना दिसून येत नाही.
बॉटनीकल गार्डनची प्रतीक्षा ?
फेब्रुवारीमध्ये तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जे.के.पार्कच्या जागेवर बॉटनीकल गार्डन व बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच यासाठी निधीची देखील तरतूद केली होती. मात्र, ही घोषणा केवळ अंदाजपत्रकापुरतीच राहिली आहे. वर्षभरात ही जागा देखील मनपा प्रशासनाने ताब्यात घेतली नसून, पदाधिकाऱ्यांनीही या जागेबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही.