मनपाची वीजबिल भरण्याची तयारी, मात्र शासनाच्या निर्णयानंतर दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:16+5:302021-03-10T04:17:16+5:30
जळगाव : पाणीपुरवठ्याची थकबाकी भरण्याबाबत महावितरणने वारंवार नोटीस बजावल्यानंतर मनपाने महावितरणला थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले. मात्र,गेल्या आठवड्यात शासनाने ...
जळगाव : पाणीपुरवठ्याची थकबाकी भरण्याबाबत महावितरणने वारंवार नोटीस बजावल्यानंतर मनपाने महावितरणला थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले. मात्र,गेल्या आठवड्यात शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्यानंतर मनपा प्रशासनातर्फे वीजबिल भरण्यासाठी दिरंगाई होत आहे. तसेच नऊ कोटींच्या बिलावर व्याज व विलंब आकार माफ करण्याची मागणीही मनपाकडून होत असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
कोरोनामुळे सर्व प्रकारच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवल्याने खान्देशात महावितरणची सुमारे १३०० कोटींच्या घरात थकबाकी जमा झाली आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने गेल्या महिन्यात सर्वत्र जोरदार वसुली मोहीम राबविली. या मोहिमेत अनेक घरगुती नागरिकांसह शासकीय पाणीपुरवठा योजनांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी सर्वाधिक नऊ कोटींच्या घरात थकबाकी असलेल्या जळगाव मनपा प्रशासनालाही थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची अंतिम नोटीस गेल्या महिन्यात बजावण्यात आली होती.
या नोटिसीनंतर मनपाने महावितरणला वीजबिल भरण्याबाबत तयारी दर्शविली होती. तसेच याबाबत मनपाचे अधिकारी व महावितरणच्या अभियंत्यांमध्ये याबाबत बैठक होऊन, मनपाने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून किमान पाच कोटींपर्यंत बिल भरण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजबिल भरण्याबाबत महावितरणतर्फे राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता घरगुती ग्राहकांप्रमाणे मनपा प्रशासनही वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करुन, दिरंगाई करत असल्याचे महावितरण प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाला अनेकदा नोटीस बजावल्यानंतर, त्यांनी गेल्या आठवड्यात वीजबिल भरण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आता राज्य शासनाने सध्या वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्यानंतर मनपा प्रशासनाकडून वीजबिल भरण्याला दिरंगाई होत आहे. तसेच नियमामध्ये नसताना बिलावरील व्याज व बिलंब आकार माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे शक्य नसल्याने मनपाने आता थकीत बिल तत्काळ भरून, महावितरणला सहकार्य करावे.
फारूख शेख, अधीक्षक अभियंता