अभय योजनेत मनपाची १ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:00+5:302021-01-23T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोना काळात थकलेली मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना देखील दिलासा देण्याच्या उद्देशाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोना काळात थकलेली मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना देखील दिलासा देण्याच्या उद्देशाने महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेनुसार ८ जानेवारीपासून ते २२ जानेवारीपर्यंत १ कोटी ७८ लाख ९ हजार रुपयांची वसुली झाली आहे. अभय योजनेचा लाभ शहरात २ हजार ६८८ नागरिकांनी घेतला असून, १० लाख ५१ हजार २६६ रुपयांची शास्ती माफ करण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाकडून वसुलीची स्थिती वाढावी म्हणून ८ जानेवारीपासून ही योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार थकबाकीदारांनी ३१ जानेवारीपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंडाच्या रक्कमेत ७५ टक्के सुट मिळणार आहे. तर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत भरणा केल्यास ५० टक्के सुट तर १५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा केल्यास २५ टक्के सुट मिळणार आहे. मात्र, १ मार्च २०२१ पर्यंत कराच्या थकबाकीचा भरणा न केल्यास पहिल्यापासून दरमहा २ टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. अभय योजना सुरु झाल्यानंतर नागरिकांचा भरणा वाढला असून, या योजनेमुळे काही प्रमाणात का असेना , मनपाच्या तिजोरीत वाढ होत आहे. ३१ मार्चपर्यंत भरणा न केल्यास पहिल्यापासून दरमहा २ टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.
एकूण झालेला भरणा
प्रभाग समिती १- ५५ लाख ९ हजार ८१०
प्रभाग समिती २ - ३६ लाख ६० हजार १४
प्रभाग समिती ३ - ५२ लाख १० हजार १६४
प्रभाग समिती ४ - ३४ लाख २९ हजार १४५
एकूण भरणा - १ कोटी ७८ लाख ९ हजार १३३
योजनेचा लाभ घेणारे - २ हजार ६८८
भरणा झालेली शास्ती - ५ लाख ३२ हजार ४१०
माफ झालेली शास्ती - १० लाख ५१ हजार २६६