नियम मोडणाऱ्यांकडून मनपाची ३६ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:57+5:302021-04-08T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून कोरोनाकाळात नियम मोडणाऱ्यांकडून महापालिका प्रशासनाने एकूण ३६ लाखांची वसुली केली आहे. यामध्ये मास्क न लावणाऱ्या दोन हजारहून अधिक नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या पथकांकडून शहरात जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे, तर दुकानामध्ये प्रमाणाबाहेर नागरिकांची गर्दी असल्यास या दुकानांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
वर्षभरात ४५० दुकाने करण्यात आली सील
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात महापालिकेने शहरातील ४५० दुकाने सील केली असून, या दुकानदारांकडून २४ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच नियम मोडणाऱ्या ४३ दुकानदारांवर मनपाकडून गुन्हे दाखलदेखील करण्यात आले आहेत. यासह नियम मोडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मनपाची वसुली जोरात
कोरोनाकाळात महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र नियम मोडणाऱ्यांकडून महापालिकेने चांगलीच वसुली केली आहे. महापालिकेकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहा पथके स्थापन केली असून, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान आता जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत आपले निर्बंध वाढवले असून, या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व झालेली वसुली
कारण - दंड झालेल्यांची संख्या - झालेली वसुली
मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई - २,२२६ - ९ लाख ५८ हजार
दुकाने व मंगल कार्यालय - ४५० - २४ लाख २६ हजार
सार्वजनिक वाहतूक - १७५ - १ लाख १६ हजार