मनपाकडून शहरातील तब्बल १७ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:01+5:302021-04-28T04:17:01+5:30
(फोटो आहेत) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतर्फे मंगळवारी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात अकरा वाजेनंतरदेखील दुकाने सुरू असल्याचे पाहावयास ...
(फोटो आहेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतर्फे मंगळवारी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात अकरा वाजेनंतरदेखील दुकाने सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने तब्बल १० दुकाने सील केली आहेत. यासह इतर भागातील ७ दुकानांवरदेखील कारवाई करत महापालिकेच्या पथकाने मंगळवारी एकूण १७ दुकाने सील केली आहेत.
सिंधी कॉलनी परिसरातील दुकाने पूर्ण दिवसभर उघडी असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार मंगळवारी अकरा वाजेनंतर उपायुक्तांनी सिंधी कॉलनी भागात अचानक धाड टाकली. यामध्ये अनेक दुकाने उघडी असल्याचे आढळून आले, व्हिडीओ छायाचित्रणदेखील महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आले आहे. महापालिकेचे पथक दाखल होताच दुकानदारांनी पटापट दुकाने लावण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेच्या पथकाने सर्व दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत. यासह शहरातील इतर भागातदेखील अनेक दुकाने उघडी असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दुकानदारांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अनेक कपड्यांची दुकाने सुरू होती. या दुकानदारांवर ही मनपाचा पथकाकडून कारवाई करण्यात आली.
या १७ दुकानांवर करण्यात आली कारवाई
सिंधी कॉलनी भागातील सोना महाजन ट्रेडर्स, आदर्श हेअर आर्ट, संगीता लेडीज कॉर्नर, आशिष कलेक्शन, पवन मोबाइल, गोधडी वाला बुक डेपो, सुपर मेन्स पार्लर, रेणुकामाता इलेक्ट्रिकल्स कुलर्स, रामा गिफ्ट गॅलरी या दुकानांसह गोपाल ट्रेडर्स, जगताप मेटल्स, मकरा केमिकल, मोहीस सहरी, इब्राहिम अँड सन्स ही दुकाने मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व यांच्या पथकातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोली, नितीन भालेराव, राहुल कापरे व सलमान मिस्त्री यांचा पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई
महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून ४४ भाजीपाला विक्रेत्यांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून तब्बल चार ट्रॅक्टर भरून भाजीपाला जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान अनेक विक्रेते व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये हुज्जतदेखील घातली होती. बजरंग बोगदा परिसरात कारवाईदरम्यान विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन काही काळ तणावाची स्थितीदेखील निर्माण झाली होती. मात्र महापालिकेच्या पथकाने अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत मोठा माल जप्त केला आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून एकाच दिवसात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.