मालमत्ताकराच्या थकबाकीदारांसाठी मनपाची ‘अभय’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:52+5:302021-01-08T04:45:52+5:30
थकबाकीदारांना मिळणार दिलासा : शास्तीच्या रक्कमेत ७५ टक्क्यापर्यंत सुट ; उद्यापासून घेता येईल लाभ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...
थकबाकीदारांना मिळणार दिलासा : शास्तीच्या रक्कमेत ७५ टक्क्यापर्यंत सुट ; उद्यापासून घेता येईल लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोना काळात थकलेली मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने मनपा प्रशासनाने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेनुसार ७ जानेवारीपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मालमत्ता कराची मुळरक्कमेसह थकबाकी भरल्यास दंडाच्या रक्कमेवर ७५ ते २५ टक्क्यांची सूट देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच आतापर्यंत थकबाकीवर एक वर्षापर्यंतच दरमहा २ टक्के दंड लावण्यात येणार होता. तो दंड आता जोपर्यंत थकबाकी भरणाकरेपर्यंत लावला जाणार असल्याचेही आयुक्त कुलकर्णी यांनी सांगीतले आहे.
शहरातील विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्तांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन,माजी महापौर नितीन लढ्ढा, सभागृह नेते ललित कोल्हे, ॲड.शुचिता हाडा आदी उपस्थित होते. या बैठकीत अभय योजनेबाबत निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत आयुक्तांनी सांगितले की, यंदा मालमत्ता कराची बिले विलंबाने वाटप करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली देखील प्रभावीपणे झाली नाही. तसेच करोना काळात सर्व सामन्य नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली व्हावी तसेच थकाबाकीदारांना देखील दिलासा मिळावा या उद्देशाने अभय योजना आणल्याचे आयुक्तांनी सांगीतले.
आधीची पध्दत
महापालिका अधिनियमातील मालमत्ता कराच्या कलमानुसर थकबाकीवर लावण्यात आलेल्या दंडात सवलत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शहरातील मालमत्ताकरांच्या थकबाकीदारांना पहिल्या महिन्यात रक्कम भरल्यास काही प्रमाणात सुटदेण्यात येते. मात्र, घरपट्टी डिसेंबरअखेरपर्यंत न भरल्यास १ जानेवारीपासून त्यावर दरमहा २ टक्के शास्ती दंड म्हणून आकरण्यात येते.
पुढील दंडाचा बोजा टळणार
थकबाकीदार मिळकतधारकांना वर्षाला २४ टक्के शास्ती लावण्यात येते. तसेच अनेक वर्ष ही रक्कम न भरल्यास २४ टक्केच शास्ती असते. मात्र, आता अभय योजनेचा लाभ न घेतल्यास १ एप्रिल २०२१ पासून एका वर्षासाठी कमाल २४ टक्के इतकी शास्ती न आकारता कायद्यातील तरतुदीनुसार कर भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून रक्कम भरेपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी २ टक्के शास्ती आकारली जाणार अहे. त्यानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात सुधारीत बिले बजावण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
काय आहे योजना ?
७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी ३१ जानेवारीपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंडाच्या रक्कमेत ७५ टक्के सुट मिळणार आहे. तर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत भरणा केल्यास ५० टक्के सुट तर १५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा केल्यास २५ टक्के सुट मिळणार आहे.
यांना नाही मिळणार लाभ
१. शास्तीची सर्व रक्कम भरणा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
२. थकबाकीदार व मिळकतधारकांना मालमत्ताकराचा संपुर्ण भरणा करणे आवश्यक आहे.
३. मालमत्ताकरासंदभार्ती दावा न्यायालयात प्रलंबीत असलेल्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
४.गाळेधारकांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे या भोगवटादारांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.
मालमत्तांचे फेरमुल्यांकन
मनपा हद्दीतील सर्व मालमत्तांचे फेरमुल्यांकनाचे काम सुरु करण्यात आले आहे. जीपीएस तसेच मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून देखील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येवून ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्व मालमत्तांचे फेरमुल्यांकन पुर्ण होईल अशी माहीती मनपा आयुक्तांनी दिली. हे फेर मुल्यांकन केवळ मालमत्ता करात सुसुत्रता तसेच समानता आणण्यासाठी केले जाणार आहे. यामध्ये करात कुठलीही वाढ केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.