मनपाचा अर्थसंकल्प ३१ मार्चला होणार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:49+5:302021-03-29T04:10:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचे १२०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर, त्यामध्ये काही बदल सुचवून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचे १२०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर, त्यामध्ये काही बदल सुचवून महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील हे ३१ मार्च रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा न करता आहे त्यांनी निधीवर भर देऊन ठराविक कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक २४ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अंदाजपत्रक अभ्यास करण्यासाठी व काही बदल सुचवण्यासाठी काही अवधी मागून घेतला होता. दरवर्षी प्रशासनाने सादर केलेल्या अंदाज पत्रकानंतर १५ दिवसांच्या आत सभापती अर्थसंकल्प सादर करतात. मात्र, महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमुळे अर्थसंकल्प अद्यापही सादर करण्यात आलेला नव्हता. ३१ मार्चपर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याची मुदत असून, ३१ मार्च रोजी आता महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद
महिनाभराच्या कालावधीत महापालिकेत मोठ्या प्रमाणात झालेल्या राजकीय घडामोडींचा प्रभाव यंदाच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. स्थायी समिती सभापतीपद जरी भाजप कडे असले तरी स्थायी समितीमध्ये आता शिवसेना व बंडखोर नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने भाजपने स्थायी समितीत देखील बहुमत गमावले आहे. शहरातील रस्त्यांसाठी सभापतींकडे शंभर कोटींची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा सर्व निधी मनपा फंड आतूनच उभा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या घोषणा केवळ ठरल्या नावालाच
गेल्यावर्षी स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये प्रभाग समिती कार्यालय अधिक सक्षम करण्याबाबतचा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र वर्षभराचा कार्यकाळात ही घोषणा केवळ अर्थसंकल्प पुरतीच ठरली. यासह शिवाजी उद्यानमध्ये बॉटनिकल गार्डन, बटरफ्लाय गार्डन केवळ नावालाच ठरले.