मनपाचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:28+5:302021-03-22T04:14:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- मनपा सन २०२१ व २२ या आर्थिक वर्षासाठी सादर होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- मनपा सन २०२१ व २२ या आर्थिक वर्षासाठी सादर होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार असल्याची माहिती मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. मनपा प्रशासनाकडून फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यावर अभ्यास करून मनपा स्थायी समितीकडून तब्बल महिनाभरानंतर हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
दरवर्षी मनपा प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आठवड्याभरातच स्थायी समितीच्या सदस्यांकडे अभ्यास केल्यानंतर अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, महापालिकेत घडलेला अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे स्थायी समितीकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला नव्हता. मनपाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे ११६९ कोटी ७० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्थायी समितीच्या सभेपुढे सादर केले आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात जळगावकरांसाठी दिलासा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला असून, यंदा कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. १० कोटी ४३ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. तसेच शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून सतावत असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी १०४ कोटींची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद
मनपा स्थायी समिती सभापती कडून मनपा प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात काही प्रमाणात बदल सुचविले असून, शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. यासह महापालिकेच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात व इतर माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्याबाबत काही बदल स्थायी समिती सभापतीकडून काही बदल सुचविण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेत झालेल्या परिणाम देखील या अर्थसंकल्पावर दिसण्याची शक्यता आहे.