मनपाची २६ रोजी महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:54+5:302021-02-20T04:42:54+5:30
जळगाव : महापालिकेच्या महासभेचे आयोजन २६ रोजी सकाळी ११ वाजता महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पध्दतीने करण्यात आले ...
जळगाव : महापालिकेच्या महासभेचे आयोजन २६ रोजी सकाळी ११ वाजता महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पध्दतीने करण्यात आले आहे. महासभेत शहरातील नवीन रस्त्यांबाबतचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. यासह मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत निर्णय घेण्यासाठी देखील विशेष महासभेचे नियोजन करण्यात येणार आहे.
आव्हाणीत समिधा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
जळगाव - धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी १० वाजता समिधा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश गोसावी यांनी केले आहे.
२५ फेब्रुवारीपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्त करा
जळगाव - शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मक्तेदाराने २५ फेब्रुवारीपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचतर्फे करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील जनजागृती मंचने एका प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
हॉकर्स,व्यापाऱ्यांची होणार कोरोना चाचणी
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. हॉकर्स व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यासाठी मनपाकडून विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासह प्रत्येक मार्केटमध्ये देखील हे शिबिर राबविण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.
सुप्रीम कॉलनीतील पाणी पुरवठ्याचे उद्या उद्घाटन
जळगाव - शहरातील सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी पाणीपुरवठा संदर्भातील पहिली टेस्टिंगदेखील यशस्वी झाली आहे. शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अमृत अंतर्गत पाणी पुरवठ्याचा शुभारंभ केला जाणार आहे. गुरुवारी या भागात पाणी पुरवठ्याची टेस्टिंग देखील करण्यात आली.
शिवसेनेची आज बैठक
जळगाव - शिवसेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे करण्यात आले आहे. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर व जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत राज्यस्तरीय शिव संपर्क अभियानाबाबात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.