गाळेधारकांना मनपाचा शेवटचा अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:46+5:302021-07-14T04:18:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका प्रशासनाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेली थकबाकी वसूल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गाळेधारकांचे बँक खाते सील केल्यानंतर मंगळवारी मनपा प्रशासनाने सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसात ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई अटळ असल्याचा इशारा दिला आहे.
मनपाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती अवलंबून असलेल्या गाळे प्रश्नावर आता मनपा प्रशासनाकडून गांभिर्याने विचार केला जात आहे. मंगळवारी मनपा प्रशासनाने सेंट्रल फुले मार्केटमधील बडे थकबाकीदार असलेल्या गाळेधारकांना शेवटचा अल्टीमेटम दिला आहे.
सर्व प्रक्रिया पूर्ण, आता केवळ कारवाई
मनपा प्रशासनाने गाळे कारवाईत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी सर्व अडथळ्यांचा अभ्यास करून, ते अडथळे आता पूर्ण दूर केले आहेत, तसेच स्वतंत्र गाळेधोरण तयार करून त्या धोरणाला महासभेची मंजुरीदेखील मिळवली आहे. त्यामुळे आता गाळे जप्त करण्यास मनपाला कोणताही अडथळा नसल्याने मनपाने संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली आहे. नुकसानभरपाईच्या नोटीसा शहरातील सर्व गाळेधारकांना देण्यात आल्या आहेत. आता प्रत्यक्ष दुकानासमोर जावून संबंधित गाळेधारकाला थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा शेवटची सूचनादेखील देण्यात आली आहे.
अल्टीमेटमनंतर भाडे भरण्याची गाळेधारकांची तयारी
मंगळवारी मनपाचे पथक फुले मार्केटमध्ये पोहोचले, तसेच ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची एक रुपयाचीही रक्कम भरली नाही. अशा गाळेधारकांच्या दुकानांसमोर जावून थकीत भाड्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अनेक गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. काही गाळेधारकांनी मंगळवारी मनपाकडे थकीत भाड्याची रक्कमदेखील अदा केली. मनपाने मंगळवारी एकूण ३ लाखांची वसुली केली आहे. येत्या काळात ही वसुली वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.