सा.बां.विभागाकडून रस्ते ताब्यात घेण्यास यावल पालिकेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 04:36 PM2017-04-18T16:36:16+5:302017-04-18T16:36:16+5:30
यावल नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते पालिकेने ताब्यात घेण्यास नगरसेवकांनी विरोध केला.
Next
यावल, दि.18- : यावल नगरपालिकेच्या मंगळवारी 18 रोजी झालेल्या मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते पालिकेने ताब्यात घेण्यास नगरसेवकांनी विरोध दर्शवित असे झाल्यास शहरात पुन्हा देशी-विदेशी दारुची दुकने सुरू होतील, अशी भूमिका बजावत रस्ते ताब्यात घेण्याच्या विषयाला विरोध केला. या निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.
पालिकेची मासीक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली मंगळवारी पार पडली. सभा पटलावर 39 विषय ठेवण्यात आले होते. विषय क्रमांक 28 वगळता सर्व विषय एकमताने मंजूर झाले. सभा अजेंडय़ावर 39 विषय होते. विषय क्रमांक 28 हा शहर हद्दीतील अंकलेश्वर-ब:हाणपूर या महामार्गासह यावल-भुसावळ हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालिकेने ताब्यात घेण्याविषयीचा होता. सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गापासून 500 मीटरच्या आतील सर्व परमीटबार, बिअरबार सह देशी विदेशी दारुच्या दुकांनाना परवाने न देण्याविषयी आदेश दिल्याने शहर व परीसरातील 13 दुकाने (बार) बंद झाले आहेत. शहरातील महामार्ग व राज्यमार्ग पालिकेने ताब्यात घेतल्यास ते पुर्ववत सुरू होवू शकतील व व्यावसायिकांचा व्यवसाय पुन्हा उभा राहील या आशेने व्यावसायिकांनी पालिकेकडे रस्ते ताब्यात घेण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार हा विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला होता. त्यावर नगरसवेक अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे व महिला नगरसेवक नौशाद तडवी यांनी रस्ते ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला. रस्त्याने अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्ता वारंवार खराब होणार असल्याने पालीका त्याची निगा राखू शकणार नसल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले असता सर्व नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवत एकमताने ठराव नामंजूर केला.