कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांची दुकानदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:31 PM2020-05-23T12:31:39+5:302020-05-23T12:32:10+5:30
गोलाणी मार्केटमधील दुकानदाराची माहिती : कारवाई टाळण्यासाठी २ हजारांची मागणी
जळगाव : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु करण्यासाठी काही नगरसेवक व जि.प. सदस्य दुकानदारांकडून पैसे वसुल करून, कारवाई होणार नाही याची शाश्वती घेत असल्याची माहिती गोलाणी व फुले मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’ ला दिली आहे.
दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आता मनपा प्रशासनाला अंधारात ठेवून व्यवसाय सुरु करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत अनेकांकडून मनपाकडे तक्रार केली जात असते. त्या तक्रारीच्या आधारावर मनपाकडून कारवाई केली जात असते.
ही माहिती मनपा प्रशासनाक डे जावू नये म्हणून काही नगरसेवक सक्रीय झाले असून, मनपापर्यंत दुकान सुरु असल्याची माहिती जावू नये म्हणून फुले मार्केटमधील दुकानदारांकडून विद्यमान मनपातील एक नगरसेवक व जि.प.सदस्य दिवसाला २ हजार रुपयेप्रमाणे वसुली करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे संबधित नगरसेवक मनपाच्या काही कर्मचाºयांना देखील संपर्कात घेवून सध्या आपली दुकानदारी चालवित असल्याची माहितीही फुले मार्केटमधील एका व्यापाºयाने दिली आहे. नगरसेवकांच्याच अशा कृत्यामुळे संतापदेखील व्यक्त केला जात आहे.
-गुरुवारी झालेल्या कारवाईची टीप देखील संबधित नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनीच मनपाला दिली असल्याचीही माहिती व्यापाºयांनी दिली. फुले मार्केटमध्ये अनेक दुकाने पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र, यासाठी काही नगरसेवकांना रक्कम द्यावी लागते. गुरुवारी अनेक नवीन दुकानदारांनी आपले दुकाने सुरु केले होते. मात्र, नगरसेवकाला आवश्यक रक्कम न दिल्याने त्यांच्याकडून मनपाकडे तक्रार केली गेली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे.