जळगावात डेंग्यूच्या खोटय़ा माहितीने नगरसेवकांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:01 PM2017-09-23T13:01:14+5:302017-09-23T13:01:43+5:30
रोगराई नियंत्रणासाठी उपाययोजना करा : मनपा स्थायी समितीच्या सभेत मागणी; मनपा रुग्णालयांमध्ये उपचारास टाळाटाळ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23 - डेंग्यूच्या रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार न करता त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविले जाते. शहरात डेंग्यूचे 1200 च्यावर रूग्ण असताना केवळ 433 चा आकडा सांगितला जातो, ही आकडेवारी खोटी आहे. वस्तुस्थिती सादर करू शकत नसल्यास अधिका:यांवर कारवाई करा अशी मागणी करून शहरात उपाय योजनांना गती देण्याची मागणी मनपा स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी सदस्यांनी केली. महापालिका स्थायी समितीची सभा दुस:या मजल्यावरील सभागृहात सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाल्यानंतर शहरात सुरू असलेल्या डेंग्यूच्या साथीवर तब्बल एक तास चर्चा झाली.
महापालिका वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात कमी पडत असल्याचा टीका प्रारंभी भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली.
शहरात डेंग्यूचे रूग्ण 1200 वर असल्याचा दावा केला जाताच सभापती वर्षा खडके यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांना माहिती सादर करण्याचे आदेश केले. शहरात डेंग्यू सदृश्य तापाचे 433 रूग्ण असून 43 जणांचे रक्त नमुने तपासणीस पाठविले असता 13 जणांना डेंग्यू असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे डॉ. रावालाणी यांनी सांगितले. मनपा रूग्णालयात प्लेटलेट देण्याची सुविधा नसल्याने तसे रूग्ण असल्यास त्यांना बाहेर किंवा जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे पाठविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात महापौर ललित कोल्हे यांनी भेट दिली असता तेथे 25 स्प्रे पंप वापराविना नवेच्या नवे पडून असल्याचे लक्षात आले. या स्प्रे पंपांचा वापर शहरात जंतूनाशके फवारण्यासाठी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर 8 फॉ¨गंग मशिन शनिवारी येथे प्राप्त होणार असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.
डेंग्यू सदृश्य रूग्णांची चार टप्प्यात वर्गवारी करण्यात आली आहे. यात अ ते ड असे क्रम देण्यात आले आहेत. अ मध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. हा दर्जा रामानंद नगर परिसराला देण्यात आला आहे. यात जीवन नगर, शास्त्री नगर, भूषण कॉलनी, अंबिका हौसिंग सोसायटी, पार्वती नगर, रूख्मिणी नगर, श्रद्धा कॉलनी भागात जवळपास 87 रूग्ण आढळून आले आहेत.
पिंप्राळा परिसरातही थैमान
आदर्श नगर परिसर व उपनगरात 15 ते 20, पिंप्राळ्यातील गुरूदत्त हौसिंग सोसायटी, सिल्क मिल परिसर व अन्य भागात 15 ते 20 भोईट नगर परिसर वाघुळदे नगर, एस.एम.आय.टी. परिसर भागात 12 ते 15 रूग्ण असल्याचा अहवाल आहे. यासह मेहरूण परिसरातही डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण आढळून येत आहेत.
महाबळला 56 रुग्ण
महाबळ परिसरातील महाबळ कॉलनी, हनुमान कॉलनी, देवेंद्र नगर, नागेश्वर कॉलनी, संभाजी नगर, मोहाडी रोड, मोहन नगर, तिवारी नगर भागात जवळपास 56 रूग्ण आहेत.