सत्तेसाठी भांडून झाल्यानंतर नगरसेवकांची ‘मील बाटके खावो’ नीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:03+5:302021-07-16T04:13:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत काही दिवसांपूर्वी सत्ता काबीज करण्यावरून एकमेकांशी भांडणारे व एकमेकांना कौरव-पांडवांची तुलना देत पत्रकबाजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत काही दिवसांपूर्वी सत्ता काबीज करण्यावरून एकमेकांशी भांडणारे व एकमेकांना कौरव-पांडवांची तुलना देत पत्रकबाजी करणारे नगरसेवक आता मनपांतर्गत होणाऱ्या कामाच्या टेंडरसाठी एकत्र येत आहेत. पक्षांतर्गत वाद पक्षापुरतेच ठेवून, टेंडरमधील स्पर्धा संपवून ‘मील बाटके खावो’ नीती मनपातील नगरसेवकांनी अवलंबली आहे. यासाठी अनेक दिवसांपासून नगरसेवकांचे बैठकांचे सत्रदेखील सुरू असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली आहे.
जळगाव महापालिकेत मात्र हा वाद नेहमीच मनपापुरताच राहिला होता; मात्र तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर काही प्रमाणात वाद वाढले असून, हे वितुष्ट वाढत होते. त्याचा परिणाम काही महिन्यांपूर्वी निघालेल्या विविध कामांच्या टेंडरमध्येदेखील दिसून आले.
नगरसेवकांचे ठेकेदार स्पर्धेत राहिले, ठेके मात्र मिळाले दुसऱ्यांनाच
मनपांतर्गत काही कामांसाठी काढण्यात आलेल्या ठेक्यांमध्ये नगरसेवकांचे काम पाहत असलेल्या ठेकेदारांनी एकमेकांशीच स्पर्धा केली. यामुळे इतर तालुक्यातील ठेकेदारांनाच शहरातील कामांचा ठेका मिळून गेला. यामुळे मनपातील नगरसेवकांच्याच स्पर्धेचा फटका नगरसेवकांनाच बसला तर ठेका मात्र इतरांनाच भेटला, त्यामुळे भविष्यात ठेक्यांमध्ये स्पर्धा झाल्यास नगरसेवकांचेच नुकसान होईल, हे हेरून, मिळून-मिसळून व स्पर्धा न करताच टेंडर भरण्याबाबतचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे.
पद्मालय विश्रामगृहात सुरू होते बैठकांचे सत्र
महापालिकेला भाजपच्या काळात काही निधी प्राप्त झाला होता. तर काही महिन्यांपूर्वीदेखील मनपाला निधी मंजूर झाला होता; मात्र निविदा प्रक्रियेत स्पर्धा झाल्याने अनेक कामे हातातून गेल्यानंतर भविष्यात हे टेंडर हातातून जावू नयेत म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून नव्या रणनीतीनुसार ‘मील बाटके खावो’ चा नारा देण्यात आल्याची माहिती काही नगरसेवकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ ला दिली आहे. यासाठी काही दिवसांपासून पद्मालय विश्रामगृह येथे नगरसेवकांचे बैठकांचे सत्र सुरू होते. अनेक बैठका झाल्यानंतर आता नगरसेवकांचे एकमतावर निर्णय झाल्याची माहिती एका नगरसेवकाने दिली आहे.