ख्वॉजामिया चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी नगरसेविकेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:45+5:302020-12-24T04:15:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ख्वॉजामिया चौकातील अतिक्रमण काढण्याबाबत या भागातील नगरसेविका दीपमाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ख्वॉजामिया चौकातील अतिक्रमण काढण्याबाबत या भागातील नगरसेविका दीपमाला काळे यांनी बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ७०० जणांनी हे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीला पाठिंबा दिला असून, या स्वाक्षऱ्यांसह अतिक्रमण काढण्याबाबतचे निवेदन मनपा प्रशासनाला देण्यात येणार आहे.
गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या ख्वॉजामिया चौकातील अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत भाजप नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेवक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून, मनपा आयुक्तांवर पुष्पवर्षावदेखील करण्यात आला होता. या आंदोलनात स्थानिक रहिवाशी व या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. तसेच अतिक्रमण काढण्यासाठी बुधवारी स्वाक्षरी मोहीमदेखील राबविण्यात आली. दरम्यान, सात दिवसात हे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नगरसेवकांनी दिला होता. सात दिवसात मनपाने कारवाई न केल्याने बुधवारी या भागातील नगरसेवकांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांची भेट घेतली. त्वरित कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई
याठिकाणच्या कारवाईसाठी मनपा प्रशासनाने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्त मागितला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक निर्णय घेणार आहेत. नाताळ, वर्षअखेर अशा कारणांमुळे बंदोबस्त मिळालेला नाही. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याठिकाणच्या कारवाईसाठी आता सत्ताधारी एकटवले असून, हे अतिक्रमण काढण्यासाठीच्या आंदोलनात शिवसेना नगरसेवकांनी सहभाग घेत या मागणीला एकप्रकारे पाठिंबा दिला आहे.