शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात नगरसेवकांचा ‘इंटरेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:48+5:302021-06-29T04:12:48+5:30
एकनाथ खडसेंचा आरोप : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने ...
एकनाथ खडसेंचा आरोप :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम महत्त्वाचे आहे. मात्र, केवळ काही नगरसेवक व मक्तेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी हे काम रखडवले जात असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच जेवढे हे काम रखडेल तेवढी या कामाची रक्कम वाढेल व प्रशासकीय मान्यता मिळाल्यास शासनाकडून जास्त निधी मिळेल, अशी ठेकेदाराची भूमिका असल्याने हे संथगतीने सुरू असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
शहरातील शांताराम अहिरे यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाचे थांबलेले काम लवकर सुरू व्हावे या मागणीसाठी मनपासमोर उपोषण पुकारले होते. सोमवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मनपासमोर जाऊन अहिरे यांचे उपोषण सोडविले.
दरम्यान, याआधी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ओबीसींना ३ महिन्यात आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र, फडणवीस वारंवार अशी वक्तव्ये करतात. कारण फडणवीस यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनावेळीही, वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाहीत, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी ही भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले असा चिमटा घेत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींच्या मुद्यावर लक्ष्य केले आहे.