परीक्षा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:01+5:302021-04-28T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागात गोपनीय कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागात गोपनीय कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.
एकाच व्यक्तीला गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठातील परीक्षा विभागातील गोपनीय कामे दिली जात आहेत. त्यामुळे वेगवेगळे अर्थशीर्षक तयार करून मोठ्या प्रमाणावर दर आकारून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप भंगाळे यांनी केला आहे. कोणतीही निविदाप्रक्रिया न राबविता, कोटी रुपयांची बिले मंजूर करून संबंधित व्यक्तीला तत्काळ पेमेंट केले जात आहे. तसेच उत्तरपत्रिका छपाई, विविध प्रकारची सर्टिफिकेट्स, निकाल लागल्यानंतरचे लेजर्स बाइंडिंगसह कॉलेजेसला पाठवण्यात आलेली पत्रे आदी कामे संबंधित व्यक्तीकडून जास्तीच्या दराने केले जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करून विद्यापीठाचे प्रचंड नुकसान होत आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी विष्णू भंगाळे यांनी केली आहे.