हिवाळा सुरू होताच बाजारपेठेला ‘कॉस्मेटिक लूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:25 PM2019-11-20T22:25:15+5:302019-11-20T22:25:33+5:30
विंटर केअर : बॉडी लोशन, कोल्डक्रीम, पेट्रोलियम जेलीला मागणी
जळगाव : हिवाळा सुरू झाला की काळजी सुरू होते ती त्वचेची. त्वचेच्या या काळजीसाठी थंडीच्या चार महिन्यात बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, मॉईश्चराईजर, पेट्रोलियम जेली यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढून वर्षातील इतर ऋतूंपेक्षा या ऋतूत विविध प्रकारच्या कॉस्मेटिकची सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे थंडीचे हे दिवस जणू ‘कॉस्मेटिक सिझन’ बनून जातात.
वर्षभर तशी कॉस्मेटिकची मागणी असते. मात्र उन्हाळा व पावसाळ्यापेक्षा सर्वाधिक कॉस्मेटिकची विक्री होते ती हिवाळ्यात. थंडीमध्ये त्वचेच्या काळजीसाठी पूर्वीपासूनच वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. यामध्ये सर्वाधिक वापर व्हायचा तो पोमेडचा. आबालवृद्धांपासून सर्वच जण पोमेटचा वापर करायचे.
मात्र गेल्या दशकभरात हे चित्र पूर्णत: बदलले असून पोमेटची जागा विविध प्रकारच्या बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, मॉईश्चराईजर, पेट्रोलियम जेलीने घेतली आहे. यांनी केवळ जागाच घेतली असे नाही तर अख्खे ‘मार्केटच’ काबीज केले आहे. यामध्ये सुरुवातीला काही ठराविक कंपन्या होत्या, मात्र आता एक-दोन नव्हे तर अर्धा डझनहून अधिक कंपन्या यात उतरल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना ‘रिस्पॉन्सही’ मोठा आहे. आधी केवळ एका प्रकारचे हिवाळी ‘कॉस्मेटिक’ तयार करणाऱ्या कंपन्यांनी वेगवेगळे ‘फ्लेवर’ आणले आहे. त्यामुळे बाजारात याची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी त्या-त्या त्वचेनुसार ‘कॉस्मेटिक’ उपलब्ध आहेत. त्वचेच्या या काळजीमुळे बाजारपेठेत दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये केवळ महिलांची मागणी आहे असे नाही तर पुरुषही यात मागे नाही. एकूण मागणीमध्ये ६० टक्के महिला आहे, तर ४० टक्के पुरुष आहेत.
‘विंटर सोप’लाही मागणी
थंडीमध्ये वेगवगळ्या साबणांची मागणी होते़ याते ग्लिसरिनयुक्त साबणाचा वापर अधिक केला जातो.
-पोमेटची जागा घेतलेल्या हिवाळी ‘कॉस्मेटिक’मध्ये पेट्रोलियम जेलीनंतर आलेले बॉडी लोशन ग्राहक केवळ शरीरापुरते मर्यादित ठेवत असून चेहºयासाठी कोल्ड क्रीमचा वापर करीत आहे.
-महिलांची अधिक ‘चॉईस’ असते. कोरडी, तेलकट व मध्यम या तीनही प्रकारच्या त्वचा रुक्ष पडतात. त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहे.
-आॅक्टोबर ते जानेवारी असा हिवाळी ‘कॉस्मेटिक’चा ‘सिझन’ असून गेल्या काही वर्षांपासून त्याची दणक्यात विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदाही चांगली मागणी असून दरवर्षी ही मागणी वाढतच असल्याचे सांगण्यात येत आहे.
-सुरुवातीला दुकानात एका कपाटात हे साहित्य बसत होते; मात्र आता त्यासाठी १० कपाट असले तरी माल कोठे ठेवावा? असा प्रश्न विक्रेत्यांना पडत आहे.
-त्वचेच्या काळजीसाठी बाजारात एवढ्या वस्तू असताना ओठांची काळजी मागे कशी राहणार? ओठांच्या काळजीसाठीही बाजारात विविध ‘लिप केअर’ उपलब्ध आहेत. त्यातही दरवर्षी आधुनिकता येत आहे.
पोमेटचा केवळ १० टक्केच वापर
त्वचेच्या काळजीसाठी पोमेटचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. हातापायासह चेहरा, ओठालाही पोमेटच लावले जायचे. मात्र आता हातापायासाठी लोशन आले आहे, तर चेहºयासाठी स्वतंत्र कोल्ड क्रीम आल्या आहेत. पूर्वी आबालवृद्ध वापरत असलेच्या पोमेटचा आता केवळ १० टक्केच वापर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
विंटर केअरची रेंज
पेट्रोलियम जेली- २० ते १०० रुपये
बॉडी लोशन- १० ते २०० रुपये
मॉईश्चराईझर- ४० ते २५० रुपये
कोल्ड क्रीम- २० ते १०० रुपये
पोमेट- ४५ रुपयांपासून